• हजारों युवक – युवतींना रोजगाराची संधी
• मनसे नेते राजू उंबरकर यांनी सहभागी होण्याचे आवाहन.
अजय कंडेवार,वणी :- वणी विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षीत आणि कुशल युवक – युवतींना यशस्वी करिअरची संधी मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील ७० पेक्षा अधिक उद्योग, सेवा आणि खाजगी क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहे.
विपुल खनिज संपत्तीने नटलेला भाग असलेल्या वणी मतदारसंघात १८ पेक्षा जास्त कोळसा खाणी आहेत तर त्यावर आधारित अनेक कंपन्या व उद्योग आहेत . तरी सुद्धा अनेक सुशिक्षीत युवा रोजगारा पासुन वंचित आहे. याचाच परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. तर रोजगार नसल्याच्या नैराश्यातून अनेक आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्या. या समस्येवर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून मनसे रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मागील २ महिन्यापासुन पक्षाकडून मतदारसंघांत या विषयी प्रचार प्रसार करण्यात आला. तर अधिकाधिक बेरोजगारांच्या नोंदण्या यामध्ये करण्यात आल्या. तर तिन्ही तालुक्यांत विविध ठिकाणी मार्गदर्शकाकडून मुलाखत पूर्व प्रशिक्षण देण्यात आले. आता या महोत्सवाचा अंतिम टप्पा म्हणुन दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी वणी शहरांतील शिक्षण प्रसारक मंडळ ( SPM हायस्कूल ) च्या प्रांगणात या अर्जदारांची सहभागी कंपन्यांकडून मुलाखत घेतल्या जाणार आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात येणारं आहे. पाच हजारांपेक्षा अधिक पदांसाठी याठिकाणी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहे.
दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय, वणी (SPM शाळा) येथे वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक युवकाला नोकरीची सुवर्णसंधी असून आतापर्यंत ज्या सुशिक्षित बेरोजगारांनी आपले अर्ज भरले नसतील त्यांनी या ठिकाणीही अर्ज भरू शकता. त्यानंतर रोजगार मेळावा संपूर्ण जिल्ह्यात सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांकरिता संधी उपलब्ध झालेली असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
युवकांनो… मोठ्या संख्येने रोजगार संधीचा लाभ घ्या..!
” मतदारसंघातील शिक्षित आणि कुशल युवक – युवतींना यशस्वी करिअरची संधी मिळावी, या उद्देशाने ३ डिसेंबरला मनसे रोजगार मेळावा – २०२३ आयोजित करण्यात आला आहे. देशातील ७५ पेक्षा जास्त नामांकित कंपन्या आपल्या दारी येतं असुन प्रत्येक युवकाला नोकरीची सुवर्णसंधी यामाध्यमातून उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत ज्या सुशिक्षित बेरोजगारांनी आपले अर्ज भरले नसतील त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय या ठिकाणीही अर्ज भरू शकता. तर मतदारसंघांतील जास्तीत जास्तं बेरोजगारांनी या नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा “.- राजु उंबरकर पक्ष नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना