•जि.प, न.प निवडणुकीचा मुहूर्त कधी….?
•एका वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकाच्या हातीच
अजय कंडेवार,वणी :- मुदत संपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल कोरोनानंतर 2022 मध्ये वाजेल अशी शक्यता होती. परंतु 2022 वर्ष संपले तरी सरकारकडून या निवडणुकीबाबत अद्याप पावतो कुठलाच निर्णय झाला नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या तारखाकडे विविध पक्षांच्या नेत्यांचे व इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे.
कोरोनाची परिस्थिती निवडल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली होती, परंतु अचानक राज्य सत्तांतराचा होऊन शिंदे फडणवीस सरकार राज्यात विराजमान झाले, त्यानंतर ऑक्टोंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते, परंतु या निवडणुकीच्या संदर्भात झालेल्या विविध चर्चा केवळ चर्चा ठरल्या, 2022 वर्षे संपले तरी निवडणुकीची पहाट उगवलीच नाही, त्यामुळे बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची निराशा झाली आहे. तालुक्यातील वणी या नगरपालिकेचा व पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा कार्यकाळ जानेवारी 2022 व म संपुष्टात आला. परंतु त्यावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोकेवर काढल्याने या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या. त्यानंतर या पालिकावर व पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली, आजही प्रशासकराज या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आहेत,
परंतु त्यानंतर महाविकास आघाडीने कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर एप्रिल 2022 पासून पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता, त्याचप्रमाणे पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्कल निहाय आरक्षण तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाचे आरक्षण या सर्व बाबी मार्गी लावल्या होत्या, त्यामुळे अवघ्या काही दिवसात निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु जुलै महिन्यात सत्तांतर झाले ओबीसी आरक्षण, पुन्हा नव्याने वॉर्ड रचना प्रभागपद्धतीत बदल इत्यादी विविध सुधारणा शिंदे-फडणवीस सरकारने पुढे आणल्या. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणे अपेक्षित होते. परंतु तसे काहीच घडले नाही मोर्चे बांधणी करून बसलेले सर्व भावी नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या इच्छेवर 2022 वर्षांनी पाणीच पेरले.