Wani:-महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला जागतिक व्यासपीठावर नेणारा एक अभिमानास्पद क्षण साकारत आहे. Somayya Group of Institutionsच्या पुढाकारातून तब्बल ५,००० मुली व महिलांचे एकाच वेळी लावणी नृत्य सादरीकरण घडवून आणत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा भव्य संकल्प पूर्णत्वास येत आहे. शिक्षण आणि संस्कृती यांचा अनोखा संगम साधत ‘सोमय्या’ने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
हा ऐतिहासिक कार्यक्रम रविवार, १ मार्च २०२६ रोजी चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर दुपारी ४ ते सायंकाळी ८ या वेळेत पार पडणार आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि एकसुरात सादर होणारी लावणी ही केवळ नृत्यकला नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागतिक आविष्कार ठरणार आहे. हजारो महिलांचा सहभाग हा स्त्रीशक्तीचा सामूहिक उत्सव ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर यांच्या नेतृत्वाखाली BAMS, B.Tech, Polytechnic, B.Pharm, D.Pharm, B.Sc Nursing, Junior College, ITI आणि CBSE School अशा विविध शैक्षणिक शाखांचा सहभाग या उपक्रमात आहे. शिक्षणासोबत सांस्कृतिक जपणूक आणि महिलांना व्यासपीठ देण्याचा संदेश देणारा हा उपक्रम राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

