Ajay Kandewar,Wani : मुकुटबन पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीबाबत सध्या नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षकांसह(PSI) अनेक कर्मचारी हे वणी येथे मुक्कामी राहत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुकुटबन परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, नुकतेच नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक जाधव मात्र एकटेच 24x 7 मुख्यालयी राहत असल्याची माहिती समोर येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावरच संपूर्ण जबाबदारी येत असल्याने प्रशासकीय कामकाजावर ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतर अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात नियमितपणे उपस्थित नसतील, तर दैनंदिन कामकाज आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळताना अडचणी निर्माण होऊ शकतात.
मुकुटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध औद्योगिक हालचाली, वाहतूक तसेच ग्रामीण भागातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता, पोलिसांची स्थानिक उपस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, अधिकारी व कर्मचारी मुख्यालयाऐवजी इतरत्र मुक्कामी असतील, तर एखादा अनुचित प्रकार घडल्यास तातडीने प्रतिसाद देणार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी एखादी गुन्हेगारी घटना, अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांचा विलंबित प्रतिसाद परिस्थिती गंभीर करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात पोलिसांची तत्परता आणि उपलब्धता ही नागरिकांच्या सुरक्षेची हमी मानली जाते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालयात राहून जबाबदाऱ्या पार पाडणे अपेक्षित असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.या संदर्भात पोलिस प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी, मुख्यालयात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता वरिष्ठ पातळीवरून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(टीप:- A.I इमेज घेण्यात आलेले आहे)
क्रमशः…….

