Ajay kandewar,वणी – नगरपालिकेच्या मतदारयादीत मोठा घोळ करण्यात आला आहे. वणीची प्रभाग रचना बदलली. प्रभाग रचना बदलल्यावर मतदारयादी अपडेट करणे गरजेचे होते. मात्र पालिका प्रशासनाने मतदारयादी अपडेट केली नाही. नागरिकांना मतदारयादीच्या घोळात गुंतवून ठेवण्याचा हा प्रकार असून मतदार जर गुंतून राहिले तर पालिकेला इतर मनमानी कारभार करण्याची मुभा मिळेल. यासाठीच हे षडयंत्र आहे, असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा नगरपालिकेवर केला.
अंकुश बोढे यांनी स्पष्ट केले की, वणी नगर परिषदेच्या 2025 च्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित करण्यात आली, त्या अनुषंगाने मतदार यादी तयार करणे गरजेचे होते. मात्र ही यादी अपडेट केली गेली नाही. सद्यस्थितीत तयार झालेल्या मतदार यादीत अनेक ठिकाणी विसंगती आढळून येत आहे. काही मतदार प्रत्यक्षात एका प्रभागात वास्तव्यास असून त्यांची नावे दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या चुकीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर 13 ऑक्टोबर पर्यंत आक्षेप घेता येणार आहे. परंतु हा एक षडयंत्राचा प्रकार असून नागरिकांना मतदारयादीच्या घोळात गुंतवून ठेवल्यास पालिकेला इतर मनमानी कारभार करण्याची मुभा मिळेल. असा आरोप अंकुश बोढे यांनी केला आहे. त्यामुळे, आपण याची तत्काळ दखल घेऊन प्रभाग रचनेनुसारच प्रत्येक नागरिकाचे नाव त्याच्या वास्तव प्रभागात असलेल्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावे. यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुयोग्यपणे पार पाडता येईल. जर हा घोळ त्वरित दूर करण्यात आला नाही तर मनसे यावर तीव्र आंदोलन करणार, असा इशारा देखील मनसे तर्फे देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे क्रिष्णा निमसटकर,शंकर पिंपळकर,सुरज पळसकर,प्रवीण बोतरा ,सुजल तिवरी,अहमद रंगरेज,स्वयंम ठाकरे, नवीन पिंपळकर, श्रेयश वारारकर, योगेश ताडम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.