Ajay Kandewar,Wani:- नगरपरिषद सदस्यपद व थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होत असून, या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यवतमाळात जिल्हाधिकाऱ्यांनी शहर हद्दीत पूर्ण दिवस दारूबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहावी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या काळात सलग तीन दिवस — मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी — नगरपरिषद क्षेत्रात मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे.या कालावधीत शहरातील देशी तसेच विदेशी मद्याच्या सर्व ठोक व किरकोळ दुकानांना आपले व्यवहार बंद ठेवावे लागणार आहेत. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करणे सर्व मद्यविक्रेत्यांवर बंधनकारक असून, नियम तोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.मतमोजणीच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये आणि लोकशाही प्रक्रियेवर विश्वास टिकून राहावा, यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

