Monday, December 22, 2025
Homeवणी"इकडे शेतकरी घेत आहे मरणाचे झोके,तरीही म्हणता महाराष्ट्र एकदम ओके…....."

“इकडे शेतकरी घेत आहे मरणाचे झोके,तरीही म्हणता महाराष्ट्र एकदम ओके……..”


•यंदाच्या झडत्या राजकीय घडामोडीवर….

  • •अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची व्यथा आणि कथाच झडत्यातून

सुरेंद्र इखारे,वणी – भारत हा कृषिप्रधान देश आहे . कष्टकरी ,शेतकरी ,शेतमजुरांचा पोळा हा सर्वात मोठा सण आहे . यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उदभवले असतानाही शेतकऱ्यांना वर्षभर कष्ट करण्याऱ्या सर्जा राजाचा सण साजरा करावाच लागतो .

यावर्षीच्या पोळ्याच्या सणात अतिवृष्टीमुळे हैराण झालेला शेतकरी व त्याकाळात राजकारणात झालेल्या घडामोडी एकीकडे शेतकऱ्यांचं दुःख तर दुसरीकडे राजकारण्यांच्यात पैशाचा पाऊस या आधारावर यावर्षीच्या पोळ्यात झडत्या गुंजनार आहे. वणीच्या शासकीय मैदानावर भरणाऱ्या पोळ्याच्या पूर्वसंध्येला झडत्याचा माहोल राहणार आहे.

जसे ……गुवाहाटीत चाळीस आमदारांनी घेतले
पन्नास पन्नास खोके – २
म्हणून राज्याच्या सत्तेत बसले रानबोके,
इकडे शेतकरी घेत आहे मरणाचे झोके,
तरीही म्हणता महाराष्ट्र एकदम ओके……
एक नमन कवडा पार्वती हर बोला हर हर महादेव… अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे चित्र स्पष्ट करणाऱ्या काही झडत्या सुद्धा यंदाच्या पोळ्यात लक्षवेधक ठरणार आहे अतिवृष्टी रे अतिवृष्टी, त्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे हाल रे ,मात्र मंत्री साहेब म्हणतात रे शेतकऱ्यांचे अश्रू पुसू रे … एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव…. या झडत्यानी शेतकऱ्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच खलील झडत्या .. वाटी रे वाटी
खोबऱ्याची वाटी..!
खोबऱ्याच्या वाटीची
भरली हो ऽऽऽ ओटी..!
ओटी मध्ये घेतले
पन्नास कोटी…
आमदार पळाले
हो ऽऽऽऽ गुवाहाटी..!!
गुवाहाटीले ढोसली ताडी
मग म्हणे हो ऽऽऽ
काय ती झाडी..!!
झाडी , डोंगर पाहून
आमदार म्हणे ओके…!
तवा महाराष्ट्रावर बरसे होऽऽऽऽ
अस्मानाचे धोके
अस्मानाने शेतकऱ्याच्या
डोळ्यातला आणला पूर..!!
तवा बंडखोर खाये हो ऽऽऽ
बोकडाचे मुंडी अन् खूर..!!!

एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

पोळी रे पोळी
पुरणाची पोळी
विरोधक आमदारावर होऽऽऽ
ईडी ची टोळी..
आयाराम आमदाराले
क्लीनचीटची गोळी..!
महागाईच्या वणव्यात हो ऽऽऽ
जनतेची होळी..!
ऊतरली नाही महिलांच्या
डोक्यावरून मोळी.. !
तरी लालकिल्याहून सुनवली हो ऽऽऽऽ
भ्रष्टाचारावर लोळी..!!

एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

••आज सायंकाळी शासकीय मैदानावर वेगवेगळ्या प्रकारच्या झडत्यांची रंगत पाहायला मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेला शेतकरी व त्याचा सर्जा राजा यांच्या व्यथा या झडत्यांच्या रुपात रंगणार आहे. या झडत्यातून मनोरंजनासोबतच प्रबोधन आणि शेतकऱ्यांच्या समस्या झडत्यातून व्यक्त होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments