वणी : देशमुखवाडी येथील लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी सेवानिवृत्ती गौरव व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. अनेक वर्षे संस्थेत निष्ठेने सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक रवींद्रनाथ लिचोडे, राजू पाटील, गणेश कोल्हे तसेच कर्मचारी राजू देवगडे, मंदा बिपल्लीवार व कोकिळा कडू यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच कु. सपना मधुकर ढवस यांची पवित्र पोर्टलद्वारे यवतमाळ जिल्हा परिषद शाळेत निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार होते. उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, महेंद्र श्रीवास्तव व पुरुषोत्तम खोब्रागडे, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, पर्यवेक्षिका सुनीता खुसपुरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. गुरुस्तवन, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सत्कारमूर्ती लिचोडे व पाटील यांनी सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत संस्थेने दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विश्वस्त महेंद्र श्रीवास्तव, प्रशांत गोडे व प्राचार्या चित्रा देशपांडे यांनीही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगतात संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सत्कारमूर्तींच्या दीर्घ सेवेला सलाम करत, “सेवानिवृत्ती हा शेवट नसून नव्या पर्वाची सुरुवात आहे. संस्थेसाठी आपण दिलेली सेवा आणि योगदान सदैव स्मरणात राहील. पुढील आयुष्य आनंदाने, निरोगीपणे व समाधानाने जगा,” असे सांगत शुभेच्छा दिल्या. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यातून संस्थेने कृतज्ञता, संस्कार व सेवाभावाची परंपरा जपली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मृणाल चोधरी व शेहजीन शेख यांनी केले.

