वणी :- काल दिनांक २८/९/२०२२ रोजी बुधवारला झरी केंद्रांतंर्गत सर्व शाळेचे मुख्याध्यापक व उपशिक्षक,विषयशिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सुर्ला येथे उत्साहात संपन्न झाली.
शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी झरी(जा.) पं.स.चे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे व सुर्ला गावच्या सरपंचा उषा कुडमेथे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष आत्राम,झरी केंद्राचे केंद्रप्रमुख विनोद मडावी, सतीश कुरेकर,गटसंसाधन केंद्र झरी(जा.) व सोबतच सर्व शा.व्य.समितीचे सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जि.प.उच्च प्राथमिक शाळा सुर्लाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक रमेश बोबडे यांचे सुयोग्य नियोजनाखाली शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन करतांना गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी निपुण भारत उपक्रमाबाबत तसेच BALA व झेप या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाशी निगडित विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी प्राथमिक शिक्षकांवरची जबाबदारी खुप मोठी असुन शिक्षकांनी अद्ययावत राहून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गोडी निर्माण व्हावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञान,ज्ञानरचनावाद ,यांचा वापर करून शालेय भिंती,परिसर,फरश्या बोलक्या करुन विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचे आवाहन केले.तसेच कालमर्यादित अभिनव “झेप”उपक्रमाची अंमलबजावणी बाबत सुयोग्य मार्गदर्शन केले.शिक्षण परिषदेत विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन तज्ञ शिक्षकांनी केले .यात निपुण भारत ,FLN, गुणवत्ता विकासाबाबत विविध उपक्रम याविषयी श्री.विनोद मडावी, माता पालक गटाविषयी आनंद शेंडे, विद्यार्थ्यांची यशोगाथा नवघरे पाठ्यपुस्तकातील कवितांचे स्वचालित गायन जीवन आडे, आनंददायी शिक्षण व कृतीयुक्त अध्ययन श्री.प्रशांत सोयाम ,युट्युबनिर्मिती व वर्ग अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर प्रमोद ढेंगळे, यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेत उपरोक्त सर्व विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन सोबतच आंतरजिल्हा बदलीने बदली झालेल्या निमणी येथील उपशिक्षिका राणू नागफासे,तसेच झमकोला शाळेचे विषयशिक्षक अमरदीप कावळे यांचा सत्कार करण्यात आला.गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांचा सुर्ला शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य,तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सोबतच आदर्श शिक्षक केंद्रप्रमुख विनोद मडावी यांचाही सत्कार करण्यात आला.
शिक्षण परिषदेचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन रमेश बोबडे सर यांनी तर सूत्रसंचालन सूरेश पेंढरवाड यांनी तर आभारप्रदर्शन मेश्राम सर यांनी केले. सर्व शिक्षक, शाळेतील विद्यार्थ्यांना सहभोजनानंतर शिक्षण परिषदेची सांगता झाली.