•मारेगाव येथे शौर्य दिन निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
नागेश रायपूरे, मारेगाव:- संविधान दिनाचे औचित्य साधुन ४ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या “संविधान गौरव दिन” परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.यात “अ” गटातून कु.तनुष्का वेणुशाम बाभळे तर “ब” गटातून कु. खुशी प्रशांत सपाट या दोन्ही विद्यार्थ्यांनी तालुक्यातुन प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला.
१ जानेवारी २०२३ रोजी येथील धम्म राजीका बुद्ध विहार मारेगाव येथे भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जय भीम उत्सव समिती मारेगावच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. अविनाश घरडे होते. तर बक्षीस वितरक म्हणुन ठाणेदार राजेश पुरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा चे तालुका अध्यक्ष धर्मराज सातपुते, समता सैनिक दलाचे तालुका संघटक मार्शल प्रकाश ताकसांडे, भालशंकर सर होते.
यात सकाळी ९.३० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. व सकाळी १०.३० वाजता धम्मराजीका बुद्ध विहार येथे सामूहिक बुद्धवंदना. तसेच सकाळी ११.३० वाजता आंबेडकर मार्चचे प्रणेते तथा प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक व लेखक आयु. रमेशजी जीवने यवतमाळ यांचे वर्तमान, राजकीय, लोकशाही ,भारतीय राज्यघटना व धम्मक्रांती या विषयावर जाहीर व्याख्याना चा कार्यक्रम पार पडला. तसेच दुपारी १२.३० वाजता संविधान दिनाचे औचित्य साधुन ४ डिसेंबर रोजी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या “संविधान गौरव दिन” परीक्षेचे भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
तालुक्यातील एकुण ४५१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत “अ” गटातून जि. प.उ.प्रा. शाळा कोसारा येथील विद्यार्थ्यांनी कु. तनुष्का वेणुशाम बाभळे ही प्रथम तर पियुष रुपेश्वर बाभळे हा द्वितीय तर आदर्श हायस्कूल मारेगाव येथील कु. सृष्टी वसुमित्र वनकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच “ब” गटातून दर्शन भारती विद्यालय गोंडबुरांडा येथील विद्यार्थीनी कु. खुशी प्रशांत सपाट ही सर्वाधिक गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकाविला तर आदर्श हायस्कूल मारेगाव येथील कु. सृष्टी सुर ही द्वितीय तर युगांतर आश्रम शाळा येथील प्रथम अशोक पेंदोर हा तृतीय आला.या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस, भारतीय संविधान प्रत, प्रमाणपत्रसह गौरव चिन्ह देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जय भीम उत्सव समितीचे गौरव चिकाटे, निलेश तेलंग, नागेश रायपूरे, वसुमित्र वनकर, ओमप्रकाश पाटील, दिलीप शंभरकर,सुदर्शन पाटील, रेखाताई काटकर, नूतनताई तेलंग आदींनी परिश्रम घेतले.