Ajay Kandewar,Wani:- वणी नगरपरिषद निवडणूक म्हणजे यावेळी केवळ नगराध्यक्षपदाची लढाई नसून, ती थेट नेत्यांच्या मान–सन्मानाची, अहंकाराची आणि राजकीय अस्तित्वाची कसोटी बनली आहे. प्रत्येक प्रमुख पक्षाचा नेता छातीठोक आत्मविश्वासाने सांगत फिरत असला, तरी वास्तवात ही निवडणूक अनेकांच्या झोप उडवणारी ठरली आहे.
२०१६ च्या निवडणुकीत भाजपाने एकतर्फी बाजी मारली होती. त्या वेळी मोदी लाट, भाजपाचा जोरदार प्रभाव आणि माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांचा करिष्मा यामुळे विरोधक अक्षरशः नामोहरम झाले होते. पण तोच जादूचा फॉर्म्युला आजही चालतोय का? हा प्रश्न आता वणीच्या चहाच्या टपऱ्यांपासून ते राजकीय बैठकांपर्यंत चर्चेचा विषय ठरला आहे.भाजपाच्या विजयाच्या आठवणी ताज्या असतानाच, नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांच्या शिवसेना (उबाठा) गटाने थेट रग्गड ताकद लावली आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवकांची मजबूत फळी उभी करून त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे — “वणी आता आमचीही आहे.”दुसरीकडे, शिंदे गटाकडून विजय चोरडिया यांनी मैदानात उडी घेत सुशिक्षित युवती पायल तोडसाम यांना नगराध्यक्षपदाचा चेहरा करत तब्बल ३० नगरसेवकांची टीम उभी केली आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी नव्हे, तर प्रतिष्ठेची चौफेर कुस्ती बनली आहे.
खास बाब म्हणजे तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत नगराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोधकुरवार, नवनिर्वाचित आमदार संजय देरकर आणि शिंदे सेनेचे नव्याने नेतृत्व करणारे विजय चोरडिया — तिघांसाठीही ही निवडणूक “आहे की नाही” अशीच ठरली आहे. जिंकले तर छाती फुगणार, हरले तर समर्थकांना तोंड दाखवणेही अवघड होणार, अशी स्थिती आहे.सध्या सगळ्याच पक्षांचे नेते विजयाचे दावे करत सुटले आहेत. कुणी लाट सांगतोय, कुणी करिष्मा, तर कुणी संघटनशक्ती. पण ईव्हीएम मशीनमध्ये मात्र कुणाचेही ऐकायचे नाही. उद्या २१ डिसेंबरला मशीन उघडली की, कोणाचा आत्मविश्वास खरा आणि कोणाचा फुगा, हे जनतेसमोर येणार आहे.

