Ajay,Wani:- राखी पौर्णिमेचे औचित्य साधून वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या पत्नी तसेच सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष किरण देरकर यांच्या पुढाकाराने वणी येथे रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांना भेटवस्तू देऊन राखी बांधण्यात आली. स्नेह, आपुलकी आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ करणाऱ्या या उपक्रमामुळे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी बोलताना किरण देरकर यांनी रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून परस्पर विश्वास, संरक्षण, जबाबदारी आणि आपुलकीचा स्नेहबंध दृढ करणारा दिवस आहे, असे सांगितले. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता हा आपल्या कुटुंबाचा एक भाग असून, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत संघटनात्मक पातळीवरही हीच आपुलकी आणि एकजूट कायम ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.पक्षाचे संघटन केवळ राजकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सौ. किरण देरकर यांनी केले.
विशेषतः महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, गरजू नागरिकांना मदत, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, स्वच्छता अभियान, रोजगार व मार्गदर्शन शिबिरे तसेच विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन पक्षाच्या माध्यमातून नियमितपणे करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.समाजाच्या अडचणीच्या काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. शिवसेना उबाठाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने आपल्या भागात समाजोपयोगी कामाची एक स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रक्षाबंधनाच्या या स्नेहबंधाचा धागा संघटनात्मक एकजुटीशी जोडत पक्षाचे संघटन बूथपासून गावपातळीपर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहनही किरण देरकर यांनी केले. पक्षाची विचारधारा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संदेश आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले.यावेळी शिवसेना उबाठाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय देरकर यांना राखी बांधून राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.या रक्षाबंधन सोहळ्याच्या माध्यमातून पक्षीय संघटनासोबतच सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा संदेश देण्यात आला. सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे निमित्त न राहता त्यातून समाजाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास संजय निखाडे, गणपत लेडांगे, सुधीर थेरे, सुनील कातकडे, संतोष कुचनकर, पुरुषोत्तम बुट्टे, विनोद दुमणे, महेश सोमलकर, तुलसी तेवर,महिला जिल्हाप्रमुख डिमन टोंगे,शिवसेना ज्येष्ठ नेत्या व माजी जिल्हाप्रमुख सरपंच गीताउपरे, महिला तालुकाप्रमुख वणी सुरेखा ढेंगळे, महिला तालुका प्रमुख मारेगाव इंडू किन्हेकार,महिला तालुका सचिव पौर्णिमा राजुरकर, तालुका संपर्क प्रमुख झरी ममता पारखी,छबु आसूटकर पंचायत समिती सर्कल प्रमुख, अमीनाजी पठाण,महिला शहरप्रमुख सविता गुलाबराव आवारी, माजी पंचायत समिती सदस्य चंदा मुन, माजी नगरसेविका कीर्ती देशकर, नगरसेविका वर्षा किंगरे,नगरसेविका कांचन देरकर,प्रणाली देवाळकर,ग्रामपंचायत सदस्य वैशाली देठे ,माजी नगरसेविका जिजा वरारकर,तसेच सामाजिक कार्यकर्त्या वेणू झोडे,मंजू इनामे व वर्षा पोटे यांच्यासह शिवसेना (उबाठा) पक्षाचे पुरुष व महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

