•पुरात वाहून आलेल्या प्रेतावर केले होते अंत्यसंस्कार
देव येवले, झरी:- पैनगंगा नदीच्या पात्रात १६ सप्टेंबरला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. फुलसावंगी येथील वाघू शेषराव रणमले ४५ हा ११ सप्टेंबरला नाल्याच्या पुरात वाहून गेला होता. त्याचे प्रेत येडशी नदी पात्रात २२५ किमी अंतर वाहत आले. पोलीस पाटलाच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजित जाधव, पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, बिटजमादार गजानन भांदककर सह पोलीस पाटील व गावकऱ्याच्या उपस्थितीत अनोळखी प्रेतावर सरकारी सोपस्कर पूर्ण करून घटना स्थळावर अंत्यसंस्कार पार पाडले.
या घटनेचे वृत्त एका वृत्तपत्रात पाहिल्यानंतर फुलसावंगीचे मृतकाच्या नातेवाईकाने मुकुटबन पोलीस स्टेशन ला भेट दिली असता त्यांना अंत्यविधीची जागा दाखवून यथायोग्य मार्गदर्शन करून पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर तुमच्या घरी पाठवतो असे सांगून त्यांचे सात्वन केले. पोलिसांच्या वागणुकीबद्दल फुलसावंगीच्या नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपस्थित रमाकिसन मुळे, कचरू खरात सह मृतकाची पत्नी, मुलगा, मुलगी, व नातेवाईक उपस्थित होते.