अजय कंडेवार,वणी : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी येथे वाहतूक शाखेचे प्रमुख API सीता वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली दि.30 जुलै रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. विशेषतः वृक्षसंवर्धन ही काळाची गरज लक्षात घेत प्रत्येक मान्यवरांचे स्वागत वृक्ष (sapling) देऊन स्वागत करण्यात आले.
दिवसेंदिवस शहरात अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. याकरिता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतल्यास, अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वाहतूक शाखा प्रमुख API सीता वाघमारे यांनी केले.शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस चालक, मालक, शाळेचे प्राचार्य, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
नजीकच्या काळात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. अनेक वेळा या बसेसमध्ये विद्यार्थ्यांसोबत गैरव्यवहार होतात. मात्र, या घटना टाळण्यासाठी पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपली जबाबदारी एकमेकांवर न टाकता प्रत्येकाने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे देखील सांगितले.कार्यक्रमाचे संचालन शुभांगी देशमुख तर आभार गुडिया पाठक यांनी केले.