•अन्यथा पालिकेतच बसू देणार नाही – तारेंद्र बोर्डे (माजी नगराध्यक्ष)
• 7 महिन्यांचा कालावधी लोटूनही नळ योजना दुरुस्त नाही सुस्त प्रशासनाला सवाल.
अजय कंडेवार,वणी : मागील काही दिवसांपासून वणी शहरात नळाद्वारे अतिशय घाण पद्धतीचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे. रांगणा भूरकी येथील नळ योजना तांत्रिक कारणाने बंद असल्याने निर्गुडा नदीतील दूषित पाणी वणीकर नागरिक पित आहेत. येत्या १४ मार्चपर्यंत वणी शहराला रांगणा भुरकी येथील वर्धा नदीवर तयार केलेल्या योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा न झाल्यास सीओंना पालिकेत बसू देणार नाही, असा दम माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिनांक 10 मार्च रोज शुक्रवारला दिला.
शहरातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे अतिशय दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित भागातील तक्रारी लक्षात घेता, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी शुक्रवारी वणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांची भेट घेऊन शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणिव करून दिली. वणी नगरपालिकेला सात महिन्यांचा कालावधी मिळूनही रांगणा भुरकी येथील नळ योजनेची दुरूस्ती का केली नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. नगरपालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे वणीकर जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. वणी नगरपालिका वणीकर नागरिकांच्या मुलभूत गरजाही पूर्ण करू शकत नसेल, तर अधिकाऱ्यांना कार्यालयात बसण्याचा अधिकार नाही, असे बोर्डे यावेळी म्हणाले. येत्या १४ मार्चपर्यंत रांगणा भुरकी येथील नळ योजनेची तांत्रिक दुरूस्ती करून वणी शहराला पाणी पुरवठा न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात येऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी बाेर्डे यांनी दिला.
यावेळी नगरसेवक निलेश होले, नितीन चहानकर, निखिल खाडे व वणीतील विविध प्रभागातील नागरिक उपस्थित होते. माजी नगराध्यक्षांच्या या इशाऱ्यानंतर आता नगरपालिका नळ योजना दुरूस्तीसाठी काय पाऊल उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.