•”मूलभूत प्रश्नाऐवजी जात- धर्माच्या नावावर जनतेला विभागणारे पक्ष जनतेचे पक्ष होऊ शकत नाहीत”- कॉ. शंकरराव दानव
•तरुण कार्यकर्त्यांचा माकप मध्ये प्रवेश
बिजोरा ( महागाव ) :”जे पक्ष तुमच्या मूलभूत प्रश्नावर कृती न करता जात, धर्म व भाषा यावर तुम्हाला विभागण्याचे कार्य करतात, ते तुमचे पक्ष होऊ शकत नाहीत. भारतातीलच नव्हे तर जगातील कष्टकऱ्यांना त्यांचे मूलभूत हक्कांसहित सर्व अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळावा यासाठी कम्युनिस्ट पक्ष संघर्ष तर करीतच आहेत परंतु ज्या ठिकाणी सत्तेवर येतात त्या ठिकाणी जनतेला ते मिळवून देतात”, असे प्रतिपादन महागाव तालुका कार्यकर्ता शिक्षण शिबिराचे कार्यक्रमात कॉ. शंकरराव दानव यांनी केले.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शिक्षण शिबिर बिजोरा ह्या गावात घेण्यात आले. कॉ. दयाराम जाधव यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. शंकरराव दानव, जिल्हा सचिव कॉ.कुमार मोहरमपुरी, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. ऍड.दिलीप परचाके, कॉ. ऍड.डी. बी. नाईक, कॉ. देविदास मोहकर आदी उपस्थित होते.
या शिबिराला मार्गदर्शन करताना कॉ. दानव म्हणाले, ” अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व रोजगार हे आमच्या मूलभूत गरजा असून हे देशातील प्रत्येक नागरिकाला कसे मिळतील ह्यासाठी संसद व विधानसभेत कायदे व धोरणे तयार करायची असतात. परंतु हे सर्व न करता जात, धर्म, भाषा, मंदिर-मस्जिद हे वाद उभे करून ह्या पक्षांनी आपल्या राजकारणाची प्राथमिकता ठरविली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, स्त्रिया यांचे प्रश्न गंभीर असताना संसदेमध्ये ह्यांच्या विरोधात कायदे करून, धोरणे घेऊन शिक्षण, आरोग्य, रोजगार व शेती हिसकावून घेत आहेत.
या शिबिराला कॉ. कुमार मोहरमपुरी, ऍड. दिलीप परचाके, ऍड. डी. बी. नाईक व देविदास मोहकर यांनीही मार्गदर्शन केले. या शिबिराला तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थी व युवक उपस्थित होते, त्यांनी शिबिरात शास्त्रशुद्ध मार्क्सवाद व त्यावर आधारित कम्युनिस्ट पक्षाची जडणघडण, योग्य वाटचाल व राजकारण समजून घेऊन पक्षात प्रवेश घेतला. ह्या युवकांना DYFI ह्या युवा संघटनेत सामील करून घेत सर्वानुमते महागाव तालुका समिती निवडण्यात आली. अध्यक्ष आकाश आडे, उपाध्यक्ष सचिन जाधव, सचिव सुनील पवार, सहसचिव बालाजी राठोड, कोषाध्यक्ष गोपाल बोडखे, प्रसिद्धी प्रमुख नामदेव राठोड तर कार्यकारिणी सदस्य म्हणून निखिल टिपरे, संदीप जाधव, रामदास राठोड, अशोक मोरे, पंकज जाधव, आकाश धुळे, दत्ता ससाणे, सचिन काचगुडे यांचा समावेश आहे.