•सुसाट धावणाऱ्या ट्रकांमुळे जीवित हानीचा धोका
देव येवले (प्रतिनिधी झरी) : तालुक्यातील मार्की, पांढरकवडा (ल), मुकूटबन अडेगाव परिसरात कोळसा खाण, डोलोमाईन व सिमेंट फॅक्टरी असून सर्व खान खदान मधून कोळसा इतर वाहतुकीकरिता दररोज कित्येक ट्रकची दिवस रात्र वाहतूक सुरू आहे. खाणीतून होणारा उपसा ट्रक क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात लोड करून दिवसरात्र वाहतूक सुरू असल्याने प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून अंतर्गत रस्त्याची चाळणी झाली आहे. मुकुटबन येथील कोळसा खान सुरू झाल्यापासून कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोळसा वाहतूक करणारे ट्रक दिवसरात्र सुसाट वेगाने धावत असतात.
मुकुटबन ही तालुक्यातील मोठी बाजार पेठ असून अनेक कंपन्यांमुळे स्थानिक व बाहेरील लोकांची मोठ्या प्रमाणात येथे वर्दळ असते. सकाळी व संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे स्थानिकांनी ही वाहतूक रात्री 10 नंतर सुरु करावी, अशी मागणी होत आहे. कित्तेकदा तर ट्रक वाहन चालक मद्यपान करून ट्रक चालवीत असल्याचे ही निदर्शनात आहे. यापूर्वी मुकुटबन येथील गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला अनेक वेळा निवेदने सादर करुनही कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक यांच्या वेगावर नियंत्रण आल्याचे दिसत नाही. त्यामुळे इतर वाहनधारकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. गेल्या 1 महिन्यापासून मुकुटबन येथील कोळसा खदान सुरू झाल्यापासून दररोज दिवसरात्र कोळश्याची ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे मुकुटबन ते वणी नवीन झालेल्या मार्गावरील हिवरधरा गावापासून तर पुरड पर्यंत अनेक खड्डे पडून रस्ता पूर्णता खराब झाला आहे.
ट्रकमधील कोळशावर फारडीने झाकून नेत नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर कोळसा पडलेला असतो. त्याकारणाने दुचाकीस्वाराच्या अपघातांच्या घटनेतही वाढ होत आहे. कोळसा खाणीतील व काही अधिकारी स्वतःच नियमाचे उल्लंघन करीत व पोलीस खात्यातील काही लोकांना हाताशी धरून ओव्हरलोड कोळश्याची वाहतूक दिवसाही सुरू आहे. मागील काही वर्षांपूर्वी ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या अपघातात एका व्यापाराचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संपूर्ण गाव पेटून उठला व काही लोकांनी ट्रक जाळून आपला संतापही व्यक्त केला होता. 15 दिवस तणावाचे वातावरण दिसले होते. तेव्हापासूनच जडवाहतुक रात्री 10 वाजता नंतर करण्याचा निर्णय झाला होता. काही दिवसापूर्ती ही वाहतूक नियोजित वेळेवर सुद्धा सुरु होती. मात्र आता सदर कोळसा कंपनी ठरवून दिलेल्या वेळेला व कुणालाही न जुमानता दिवसरात्र ओव्हरलोड वाहतूक करीत आहे. कोळसा कंपनीला दिवसरात्र कोळसा वाहतूक करण्याची परवानगी कुणी दिली. असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.
खदाणीतून ओव्हरलोड वाहतूक पोलीस स्टेशन कार्यालयाजवळून जात असताना स्थानिक पोलिसांना का दिसत नाही. तसेच आरटीओ विभागाणी ठरवून दिल्याप्रमाणे लोड क्षमतेनुसार करीत नाही. की फक्त अर्थपूर्ण सबंधामुळे ही निर्भय वाहतूक सुरू आहे. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण..? असा संतप्त प्रश्न ग्रामवासी करीत असून ओव्हरलोड कोळसा भरून जाणाऱ्या ट्रकवर पोलीस व आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी व शहरातून दिवसा होणारी कोळसा वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरीकांमध्ये केली जात आहे.