• गणेशोत्सवाला सासरवरून मुली माहेरी येत असतात…
•या मंडळाला जवळपास 102 वर्ष….
सुरेंद्र इखारे,वणी- गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरोना महामारीचे संकटं असल्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला होता . परंतु यावर्षी बाबापूर येथील सार्वजनिक गणेश मंडळ यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला पूर्ववत यात्रेचे स्वरूप येणार आहे . गणेश स्थापने पासून दररोज सामुदायिक ध्यान, आरती, जागृती भजन, काल्याचे भजन, वारकरी भजन, महिला मंडळाचे भजन, पदावली भजन, कीर्तन, दहीहंडी, भव्य महाप्रसाद व गणेश विसर्जनचे दिवशी परिसरातील 51 गावातील भजन मंडळीच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे दहाही दिवस बाबापूर या गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे. बाबापूर या गावाला नवसाच्या गणपतीची आख्यायिका आहे.
वणी तालुक्यातील बाबापुर या गावात 100 वर्षांपूर्वी महामारी आली होती असे जुने लोक सांगत त्यामुळे या महामारीच्या संकटातून गावकऱ्यांना मुक्त करण्यासाठी एका दाम्पत्याने गणपतीचा नवस बोलला व चमत्कार झाला . तेव्हा गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गावात एक गाव एक गणपतीची स्थापना केली. आज या मंडळाला जवळपास 102 वर्ष झाले असल्याची माहिती गावकरी सुनील धोबे यांनी दिली आहे . या उत्सवात पंचक्रोशीतील नव्हे तर विदर्भातील भाविक देखील श्रद्धेने सहभागी होत असतात . विशेष म्हणजे गणपतीच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत सतत दहा दिवस महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. परंतु महाप्रसादासाठी भाविक भक्तांना नंबर लावावा लागतो तेव्हाच ती संधी उपलब्ध होते. शासनाची एक गाव एक गणपती ही योजना पूर्वीपासून गावकऱ्यांनी जोपासली आहे व ती अव्याहतपणे सुरू राहणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून गणपतीच्या आकारामध्ये तिळमात्र फरक पडू देत नाही हे विशेष .
त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष संजय भोयर, उपाध्यक्ष दिवाकर डाहुले, सरपंच निर्मला खैरे, पोलिस पाटील मनोज अडेलवार, तंटामुक्ती अध्यक्ष अनंता खुटेमाटे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पिदूरकर व समस्त गावकऱ्यांनी तसेच शाळकरी मुलांनी सुद्धा सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे.