• रवी राजूरकरच्या अर्धशतकीय खेळीने तारले संघाला
•बक्षिसांची वर्षाव……
अजय कंडेवार,वणी: रविवारी 16 ऑक्टोबर रोजी आमेर नाईट रायडर विरुद्ध जन्नत 11 यांच्यात अंतिम सामना खेळल्या गेला. या अटीतटीच्या सामन्यात आमेर संघाने जन्नत 11 संघाचा पराभव करीत टी 10 ट्रॉफीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. या सामन्यात रवी राजूरणकरने जबरदस्त फटकेबाजी करीत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचविले. तोच या सामन्याचा सामनावीर ठरला. प्रथम बक्षीस हे आमेर संघाला, दुसऱ्या स्थानावर जन्नत संघ, तिसरे बक्षीस हे रेनबो संघाला तर चतुर्थ बक्षीस हे राजपूत रॉयल्स संघाला मिळाले. तर मालिकविर म्हणून अक्षय धावंजेवार याला रॉयल इंफिल्ड ही दुचाकी देऊन गौरविण्यात आले.
रविवारी 1टी 10 सामन्याचा अंतिम सामना हा जन्नत विरुद्ध आमेर संघ यांच्यात खेळल्या गेला. नाणेफेक जिंकून आमेर संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीच्या पाच षटकात आमेर संघ हा अडचणीत सापडला. कारण 5 षटकात 29 धावा व 4 गडी बाद अशी संघाची अवस्था होती. त्यानंतर मैदानात उतरला आमेर संघाचा कर्णधार सेनापती रवी राजूरकर हा येताच त्याने मैदानात चौकार व षटकारचा पाऊस पाडला. त्याने 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 25 चेंडूत 6 चौकार व 4 षटकार च्या मदतीने 52 धावा केल्या. व संघाच्या धावसंख्येला शतकाच्या जवळ नेऊन पोहचविले. रवी राजूरकर नावाच्या वादळाला हर्ष भारवानी याने तंबूत परतविले. परंतु तोपर्यत वेळ निघून गेली होती. आमेर संघाने जन्नत संघापुढे 101 धावांचे लक्ष ठेवले.
जन्नत संघाची सुरवात खराब झाली सुरवातीला रणजित याने 5 चेंडूत 17 धावा ठोकल्या. परंतु त्याची विकेट जाताच जन्नत संघ थोडा दबावात आला. यानंतर संघाचा कर्णधार पेंटर उर्फ अक्षय धावंजेववार हा मैदानात आला. जन्नत संघाला अक्षय कडून खूप अपेक्षा होत्या. मात्र तो अपेक्षेवर खरा उतरला नाही एक उंच फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. त्याला सौरभ बोंडे याने बाद केले. फक्त 1 धाव काढून पेंटर बाद झाला. त्यानंतर सचिन गाडगे व प्रणय शेंडे यांनी काही काळ का होईना डाव सांभाळला. परंतु चोरटी धाव घेतांना सचिन गाडगे हा धावबाद झाला. त्यानंतर जन्नत 11 चा स्टार खेळाडू गोलू उर्फ अक्षय ढेगळे व रवी जुनगरी यांना एकाच षटकात संदीप मांढरे यांने बाद केले. यानंतर मात्र जन्नत संघ अडचणीत सापडला. आमेर संघाकडून संदीप मांढरे याने 2 षटकात 5 धावा देत3 गडी बाद केले. जन्नत संघ 9 बाद 74 धावाच करू शकला. हा सामना आमेर संघाने 26 धावांनी जिंकला.
अंतिम सामन्याला बघण्यासाठी आले अनेक पाहुणे
अंतिम लढत बघण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाप्रमुख नितीन भुतडा, नामदेव ससाणे आमदार उमरखेड, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार, संजय निमकर, राकेश खुराणा उपस्थित होते.