•गाळमिश्रीत पाणीपुरवठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
अजय कंडेवार,वणी:- वणी नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्याकरिता जनतेला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबतचे निवेदन (सोमवार दि.9 ऑक्टोबर) युवासेनेचे उपजिल्हाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले.
शहरात महिनाभरापासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. त्यामुळे शहरवासीयांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणाबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरात विविध विकास कामांचा धडाका सुरु असला तरी पाणी समस्या कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात होणारा पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ आणि चिखलयुक्त होत आहे. याचा विपरित परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होत आहे. हा दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या भागामध्ये आशीर्वाद बार जवळचा परिसर ,पट्टाचारा नगर, प्रगती नगर, गुरूनगर, कनकवाडी, शास्त्रीनगर, सेवानगर, माळीपूरा हे प्रमुख आहे. यातील अनेक भागात त्याच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याचे कारण देण्यात येत आहे.लाखों रूपये खर्चूनही गाळमिश्रीत पाणीपुरवठा का होतोय ? विशेषतः या दूषित पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे जसे ताप, डेंग्यू, मलेरिया व टायफाईड ने जणू काही डोके वर काढल्याचे दिसत आहे.नागरिकांचा समस्या लवकरात लवकर न सोडविल्यास परिषदेला जाग आणण्याकरीता युवासेना तीव्र आंदोलन करेल यासाठी सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.यावेळी निवेदन देताना समस्त युवासेनेचे कार्यकर्ते व शहरातील नागरीक उपस्थित होते