•शेतकरी आंदोलनावर ठाम.
अजय कंडेवार,वणी :- शेती पिकांची नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठी कालपासून येनक – येनाडी फाट्यावर मनसेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी वेकोलिची कोळसा वाहतूक अडवून धरली. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असुन यामुळे हजारों टन कोळसा वाहतूक थांबली आहे. तर या रस्त्यांवर १ किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक मोकळी करुन वेकोलिला काम सुरळीत करु द्यावें यासाठी वेकोलिचे ताडाळी ( चंद्रपूर) येथील क्षेत्रिय महाप्रबंधक आबास चंद्रसिंग यांनी वणी उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले यांची भेट घेतली. वणीतील उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. तर या चर्चेसाठी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास वणीत आमंत्रित करण्यात आले. परंतू या आमंत्रणस गोहोकार यांच्याकडून नकार दर्शविण्यात आला. चर्चा करायची असेल तर आंदोलनस्थळी या आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या समक्ष या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तालुक्यातील पाच गावांना कोळसा वाहतुकीचा मोठा फटका बसला असून शेतीचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. तर या गावातून जाणारा रस्ता या वाहतुकीमुळे पूर्णतः उखडून गेला आहे. त्यामुळे या शेती पिकांचे नुकसान आणि रस्त्याची भरपाई करुन मिळावी यासाठी काल पासुन या गावातील ४०० ते ५०० शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कोळशाची पूर्ण वाहतूक बंद पाडली आहे. परिणामी रस्त्यांवर शेकडो गाड्या रस्त्यावर उभ्या राहिल्या व हजारों टन कोळशाची वाहतूक थांबली आहे.
या सर्व परिस्थितीवर तोडगा निघावा यासाठी क्षेत्रीय महाप्रबंधक यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली व याविषयी सविस्तर चर्चा साधली. दरम्यान या चर्चेस मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास वणीत आमंत्रित केले. परंतु आंदोलनस्थळ सोडून आम्ही कुठेही चर्चेस येणार नाही. तुम्हाला जी काही चर्चा करायची ती इथे येऊन करा आणि आम्हाला त्वरित नुकसान भरपाई द्या अशी मागणी गोहोकार यांनी केली आहे.