•नागरिकांनी लिलावात सहभागी व्हावे – शिरपूर,ठाणेदार गजानन करेवाड यांचे आवाहन.
अजय कंडेवार,वणी:- वर्षानुवर्षे शिरपूर पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा आता प्रशासनातर्फे लिलाव काढण्यात येणार आहे. बेवारस स्थितीत पडून असलेल्या 49 दुचाकी,2 चारचाकी, अशा 51 वाहनांची लिलाव प्रक्रिया होणार असल्याने वाहनांच्या मूळ मालकांनी मालकी हक्क, वारसा, तारण याबाबतचे मूळ दस्ताऐवज सादर करून वाहन घेऊन जावे अन्यथा त्या वाहनांचा लिलाव (दि.25 एप्रिल 2023)सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंतच करण्यात येणार असल्याची माहिती शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड यांनी दिली.
ताब्यात घेतलेल्या दुचाकीसह इतर वाहने खूप वर्षांपासून लावून ठेवलेली आहेत. यातील अनेक वाहनधारकांनी वाहन ताब्यात घेण्याबाबत अनास्था दाखवली आहे. त्यात अपघातासह गुन्ह्यातील वाहन घरी नको या मानसिकतेमुळेही वाहने पडून आहेत. पण यामुळे पोलीस ठाण्यांना बकालवस्था आली आहे. शिवाय या वाहनांची गणना, सुरक्षेचाही ताण वाढत आहे.पोलीस ठाण्यांचे सुशोभिकरणासह इतर उपक्रम राबविण्यासही अडचणी येत आहेत. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी यांनी बेवारस असलेली वाहने मूळ मालकांना परत देणे किंवा त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविण्याच्या आदेश दिले आहेत.
या वाहनाचा जाहीर लिलाव 25 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंतच शिरपूर पोलीस स्टेशनचा आवारात करण्यात येणार आहे.करिता या जाहीर लिलाव मध्ये परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व या जाहीर लिलावाचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले आहे.
लिलाव दिनांक 25/04/2023 रोजी करण्यात येणार असून कोणाचा लिलावा मधील दुचाकी व चारचाकी गाडीच्या मालकी हक्क बाबत काही आक्षेप असल्यास त्वरित पोलीस स्टेशन शिरपूर शी संपर्क साधावा:- प्रविण गायकवाड (9834524908).