•अखिल भारतीय किसान सभेची मागणी
वणी : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आधीच सुलतानी संकटामुळे त्रस्त असल्याने देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्यात अग्रेसर आहे. अशातच अस्मानी संकटाने शेतकऱ्यांना पुरते उध्वस्त केले आहे. जिल्ह्यातील वणी तालुक्यात तीनदा पूर आल्याने अनेक गावांतील शेती पूर्णतः पाण्यात बुडल्याने तीनदा पेरणी करावी लागली आहे. त्यानंतरही पिके वर न आल्याने चौथ्यांदा पेरणीची वेळ आली आहे. करीता ताबडतोब पुनर्सर्वे करून एकरी ५० हजार ₹ आर्थिक मदत व विना अट कर्जपुरवठा करावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.


यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात धरणाचे पाणी सोडल्याने प्रचंड असा महापूर येऊन वणी तालुक्यातील रांगणा, भुरकी,शेलू( खु ), नांदेपेरा, कोना, सावर्ला,वडगाव, उकणी, सावंगी,कवडसी, पिंपळगाव, अहेरी व इतर गावे पुरामुळे पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांच्या शेतीची प्रचंड अशी नुकसान झाली आहे. वणी तालुक्यातील वरील गावांमध्ये धरणाच्या पाण्यामुळे तिसऱ्यांदा महापूर येऊन तीन वेळा शेती पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली लागवड पूर्णपणे नष्ट झालेली आहे.

महापुरामुळे व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट आले असून त्यानंतरही शेतात काहीच उरले नाही, अशी सर्वत्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आता शेतकऱ्यांना चौथ्यांदा पेरणी करायची वेळ आली आहे. आता अश्या परिस्थिती मुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असून शेती कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून शेती पडण्याच्या मार्गावर आली आहे.

याकरीता १) पुरबाधित शेतकऱ्यांचा पुनर्सर्वे करण्यात यावा, २) पुरबाधित शेतकऱ्यांना एकरी ५० हजार ₹ आर्थिक मदत देण्यात यावी, ३) पुरबाधित शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी विनाअट राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्जपुरवठा करण्याचे बँकांना निर्देश देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात येऊन मागण्या पूर्ण न केल्यास किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा अखिल भारतीय किसान सभेचे कॉ. शंकरराव दानव, कॉ. ऍड. दिलीप परचाके, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. मनोज काळे, कॉ. नंदकिशोर बोबडे, कॉ. विवेक झाडे, कॉ. बाबाराव चटप, कॉ. दीपक हनुमंते, गुलाब तुरणकार, सुनील शेडमे, अर्जुन बावणे, अतुल बोबडे यांनी निवेदनातून दिला आहे.
