Ajay Kandewar,Wani:- वणी येथील पत्रकार रवी ढुमणे आत्महत्या प्रकरणी पाठविण्यात आलेला ई-मेल व पत्र थेट मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय मुंबई येथे पोहोचला असून, सचिवालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभागाकडे चौकशीसाठी अधिकृतरित्या पाठविला आहे. मुख्यमंत्री सचिवालयाकडून मिळालेला हा प्रतिसाद सकारात्मक मानला जात असला, तरी आता फक्त चौकशी नव्हे तर ठोस कारवाईची गरज असल्याचा सूर तीव्र झाला आहे.
या प्रकरणात सातत्याने चर्चेत असलेले “विक्की सेठ” यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. पत्रकार रवी ढुमणे यांना मानसिक, आर्थिक आणि व्यावसायिक अडचणीत ढकलणाऱ्या व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी केली आहे.इतकेच नव्हे तर या संपूर्ण प्रकारात संबंधित बँकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली असून, बँकेमार्फत झालेले व्यवहार, कर्जप्रक्रिया, दबावतंत्र किंवा नियमबाह्य बाबींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.जर बँकेकडून कोणतीही अनियमितता, दुर्लक्ष किंवा नियमभंग झाल्याचे समोर आले, तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पुढे येत आहे.मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्रकरण संबंधित विभागाकडे सोपविल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, ही चौकशी केवळ कागदोपत्री न राहता दोषींना शिक्षा होईल अशा दिशेने जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

