•आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व वणी बार असोसिएशन यांच्या प्रयत्नामुळे.
अजय कंडेवार,वणी:- तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीसाठी उच्च न्यायालयाने न्यायालय बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. प्रशासकीय मंजुराती अभावी हे प्रकरण थंडबस्त्यात पडून होते. परंतु येथील आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व वणी बार असोसिएशन वणी यांच्या प्रयत्नामुळे वणी शहरानजीक असलेल्या परसोडा येथे न्यायालयाची इमारत बांधण्यासाठी ६७ कोटी ३५ लाख रुपयांना प्रशासकीय मंजुरात मिळाली आहे.
हे न्यायालय येथील तहसील कार्यलयासमोर आहे. याच परिसरात उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, पोलिस ठाणे व इतर कार्यालये असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वर्दळ राहते. त्यासोबत येथील न्यायालयाच्या इमारतीसाठी प्रशस्त जागा नव्हती. जुनी इमारत अपुरी पडत असल्यामुळे या ठिकाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी विविध जागांचा शोध घेण्यात आला. परंतु अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे हा विषय मागील अनेक वर्षांपासून अडगळीत पडला होता. परंतु आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या
प्रयत्नामुळे शहरालगत असलेल्या परसोडा गाव शिवारात शासकीय जागेवर प्रशस्त अशी न्यायालयाची इमारत तयार होणार आहे.या इमारतीमध्ये तळमजल्या व्यतिरिक्त चार मजली इमारत तयार होईल. इमारतीमध्ये सहा कोर्ट हॉल तयार करण्यात येणार आहे. या न्यायालयाच्या मूळ इमारतीसाठी ३७ कोटी २४ लाख रुपये, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरणासाठी चार कोटी नऊ लाख रुपये, पाणी पुरवठा व मलनि:स्सारणासाठी एक कोटी ८६ लाख रुपये, फर्निचरसाठी चार कोटी १८ लाख रुपये, उदवाहनासाठी एक कोटी, सी.सी. ड्रेन, सी.सी. वर्क साठी ९० लाख रुपये, संरक्षक भिंतीसाठी ८४ लाख रुपये व इतर खर्च मिळून ६७ लाख ३५ लाख रुपये या न्यायालयाच्या इमारतीसाठी मिळाले आहेत.