● आमदार बोदकूरवार यांचे उपस्थितीत समिती सदस्यांची जिल्हाधिकारी यांची भेट
● अवैध कोळसा सायडिंग व कोलडेपो बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा
•राजूर बचाव संघर्ष समितीच्या प्रयत्नांना आले यश….
वणी : राजूर येथे नव्याने सुरू असलेले रेल्वे कोळसा सायडिंग, कोल डेपो आणि राजूर रस्त्यावर होणारी जडवाहतुक कोणतीही परवानगी न घेता सुरू असल्याने गावात प्रचंड प्रदूषण होऊन गावातील जनतेला विविध आजारांसोबत प्रचंड मानसिक, शारीरिक व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ह्यावर राजूर बचाव संघर्ष समिती चे माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून संघर्ष सुरू असताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अभ्यास समिती नेमून उपविभागीय अधिकारी यांचे कडून अहवाल मागवून नियम बाह्य कोळसा रेल्वे सायडिंग व कोल डेपोवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे अभिवचन दि. 15 सप्टेंबरला समिती सदस्यांची आमदार बोदकूरवार यांचे उपस्थितीत भेट घेतली असता दिले.
वणी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून परिचित राजूर गावात नवनवीन कोळसा कंपन्या येत असून रहिवासी क्षेत्रालगत त्यांच्या कोळसा सायडिंग व कोल डेपो उभारल्या जात आहेत. त्यामुळे गावात प्रचंड प्रदूषण निर्माण होऊन विविध आजारांना तोंड द्यावे लागत असताना दुसरीकडे रेल्वे व वेकोली कडून घरे खाली करण्याचा नोटिसा देण्यात येत असल्याने गावकऱ्यांनी राजूर बचाव संघर्ष समितीचे माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने निवेदने, बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ह्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली. ह्या अभ्यास समितीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सोपविण्यात आल्याने राजूर बचाव संघर्ष समितीने वणी क्षेत्राचे आमदार बोदकूरवार यांचे समवेत दि. 15 सप्टेंबर रोजी भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळेस राजूर वासीयांच्या समितीने केलेल्या सर्वच मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळेस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नियम बाह्य व अवैध असलेल्या रेल्वे कोळसा सायडिंग व कोल डेपोवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. तसेच जागा खाली करण्याच्या नोटिसा बद्दल रेल्वे व वेकोली विभागाकडे उत्तर मागण्यात येईल असेही सांगितले.
जिल्हाधिकारी यांच्या अभिवचनाने राजूर येथील सुरू असलेले अवैध व नियमबाह्य कोळसा सायडिंग व कोल डेपो बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांचे सांगितल्या नुसार अवैध कोळसा सायडिंग व कोल डेपो बंद न झाल्यास राजूर बचाव संघर्ष समिती नव्याने तीव्र आंदोलन करेल असेही ह्या प्रसंगी राजूर बचाव संघर्ष समितीचे माजी जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत, डेव्हिड पेरकावार, मो. असलम, अशोक वानखेडे, कुमार मोहरमपुरी, अनिल डवरे, नंदकिशोर लोहकरे, रियाजुल हसन, जयंत कोयरे, अजय कंडेवार, सावन पाटील, राहुल कुंभारे, सुरेश सिंग यांनी ईशारा दिला आहे.