Ajay Kandewar, Wani :शिरपूर पोलीस ठाण्याने केलेल्या ठाम, धाडसी आणि अचूक कारवाईमुळे वणी तालुक्यातील गुन्हेगारी विश्वाला जोरदार हादरा बसला आहे. देवस्थानातील दानपेटी फोडून श्रद्धेवर आघात करणारा चोर आणि परिसरात दहशत निर्माण करणारा कुख्यात दुचाकी चोर या दोघांनाही एकाचवेळी आवर घालत शिरपूर पोलिसांनी कायदा म्हणजे काय हे पुन्हा एकदा ठासून दाखवून दिले आहे.
वरझडी येथील महाकाली मंदिरात दानपेटी फोडून रक्कम लंपास करणाऱ्याने आपण निसटून जाऊ असा समज करून घेतला होता. मात्र शिरपूर पोलिसांनी घटनेच्या प्रत्येक हालचालीचा बारकाईने मागोवा घेत, तर्कशुद्ध विचार, तांत्रिक अभ्यास आणि क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर अवघ्या 24 तासांत आरोपी दिनेश उदंरु निकुरे याला पकडले. चोरीचा मुद्देमाल हस्तगत होताच देवस्थानातील भाविकांच्या मनातील संताप शमला आणि न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली.
ही कारवाई थांबत नाही, याचीच प्रचिती पुढील घडामोडीतून आली. परिसरात सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना पोलिसांनी चित्र जोडत जोडत अखेर मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला. त्यातूनच कुख्यात सराईत गुन्हेगार शेख आशिक उर्फ तोत्या याच्यावर शिक्का बसला. पोलिसी अचूकतेमुळे त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या तब्बल सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. चोरीच्या वाहनांचे जाळे एका झटक्यात उध्वस्त झाले आणि गुन्हेगारी टोळक्यांना थेट संदेश मिळाला.
या दोन्ही कारवायांमुळे एकूण 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून शिरपूर पोलीस ठाण्याची कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे. कायद्याची पकड घट्ट ठेवत, समाजातील अस्वस्थता ओळखून, योग्य वेळी योग्य ठिकाणी घाव घालण्याची ही उदाहरणार्थ कारवाई ठरली आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष मनोहर यांनी आपल्या पथकासह दाखवलेली सज्जता, वेग आणि आत्मविश्वास आज शिरपूर पोलिसांची ओळख बनली आहे. ईक्बाल शेख, अजय वाभिटकर, सूरज साबळे, अविनाश वानकर, रंजना सोयाम, पंकज कुडमेथे, परमेश्वर दराडे, दीपक वाकडे आणि किरण दासरवार यांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी झाली.

