•अनेकांचे निवेदने धूळ खात….
•संबधित विभागाचे एकच दिवस अँक्शन आणि बाकी दिवस रिअँक्शन का ?
•उभे ट्रक ठरताहेत यमराज…….
अजय कंडेवार,वणी :- रस्त्यांवर उभी राहणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरत असून या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही अनेक संघटनेचा वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. तरीही संबधित विभाग याकडे जातीने लक्ष कधी देईल का ? की आणखी निवेदाद्वारे जागे करण्याची गरज आली आहे असे स्पष्ट चित्र या वाढत्या दुर्घटनेचा माध्यमातून दिसुन येत आहे.
वणी तालुक्यात अनेक कोळसाखानी, कोलडेपो व लाइमस्टोन डोलोमाईटच्या खाणी आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून कोळसा व खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. कोलडेपो मधूनही कोळशाची सतत वाहतूक सुरु असते. तसेच कोल वाशऱ्यांमुळे कोळसा वाहतुकीच्या वाहनांमध्ये आणखीच भर पडली आहे. कोळसा व खनिजांची वाहतूक करणारे शेकडो ट्रक रस्त्याने सुसाट धावत असतात. वणी शहर व तालुक्यात ट्रान्सपोर्ट कंपन्यांचं जाळं पसरलं आहे. अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे कॅम्प अगदीच रस्त्यावर असल्याने वाहने रस्त्यावर उभी करून वाहनांच्या दुरुस्तीचे काम केले जाते. तासंतास वाहने रस्त्यावर उभी असतात. कोल वॉशरी व कोलडेपो मध्येही वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावरच ठिय्या मांडून उभे असतात. रात्रीही ट्रक रस्त्यावर तासंतास उभे ठेवले जातात. ट्रकच्या मागील भागाला रेडियम, ब्रेक लाईट, इंडिकेटर लावणे गरजेचे असतांनाही अनेक ट्रक मालक या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे रात्रीला रस्त्यावर उभे असलेले ट्रक छोट्या वाहनधारकांच्या दृष्टीस पडत नाही. या रात्रीच्या वेळेला रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर दुचाक्या आदळून अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत. तर अनेकांना अपंगत्व आलं आहे.
वणी यवतमाळ, वणी वरोरा, वणी घुग्गुस व वणी मुकुटबन या मार्गांनी मोठ्या प्रमाणात कोळसा व खनिजांची वाहतूक सुरु असते. या मार्गांवर रात्रीला नियमबाह्य पद्धतीने ट्रक उभे केले जातात. मागील दोन ते तीन महिन्यात या मार्गांवर अनेक भीषण अपघात झाले आहेत. हे मुख्य मार्गांवर उभे राहणारे ट्रक रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या छोट्या वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरू लागले आहेत. तेंव्हा या रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही करून ट्रक मालकांना ताकीद देण्यात आली का? जर असे केले नसेल तर या उभ्या ट्रकांमुळे निष्पाप जीवांचा बळी गेल्यास जबाबदार कोण?
प्रमुख मार्गांवर तासंतास उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही करण्याची मागणी देखिल करण्यात आली होती. पण ट्रक मालकांकडून हित जोपासले जात असल्याने या ट्रकांवर कार्यवाही होतांना दिसत नाही. आणि परिणामी निष्पाप जीवांचे बळी जात आहेत. प्रमुख मार्गांवर उभ्या करण्यात येणाऱ्या या ट्रकांवर कार्यवाही करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याकडे प्रशासन कोणती भूमिका वठविते हे बघणे गरजेचे आहे.