Ajay,Wani: वणी तालुक्यातील चारगाव येथील मुख्य चौकातील एका बारमागील शेतात असलेल्या विद्युत डीपीमध्ये काम करत असताना कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार विनोद महादेव कुळसंगे (३५), रा. निंबाळा, ता. वणी, जि. यवतमाळ असे मृतक कंत्राटी वायरमनचे नाव आहे. डीपीमध्ये काम सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, वणी येथे पाठवण्यात आला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.दरम्यान, विनोद कुळसंगे हे डीपीमध्ये नेमक्या कोणत्या परिस्थितीत काम करीत होते आणि त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सणासुदीचा काळात आणि येत्या रक्षाबंधनाच्या अगोदर घडणारी ही घटना त्याच्या कुटुंबांना हलवणारे आणि दुःखाचा डोंगर उभा करणारी घटना आहे.

