•अतिदुर्गम भागातील हजारो मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होणार !
देव येवले,झरी:- तालुका हा आदिवाशी बहुल तालुका म्हणून ओळखल्या जाते. येथील आदिवाशी मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर असतांना, शासनाने वेतन खर्चाची बाब पुढे करून कमी पटसंख्या ० ते २० च्या आत असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हि प्रक्रिया राबवल्या गेल्यास झरी तालुक्यातील तब्बल ३६ शाळा बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे तालुक्यातील आदिवाशी व सर्व सामान्य मुलांच्या मुलभूत शिक्षणावर गदा येणार आहे.
शिक्षणाचे मुलभूत अधिकार लक्षात घेऊन त्यावेळी शासनाने गावपातळीवर शाळा सुरु करण्यात आल्या. सार्वत्रिकरणाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक घटक पुढे आले. विद्यार्थी संख्येचा निकष लावून गावातील शाळा बंद झाली तर या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी उभ्या राहतील. कमी पटसंख्या असलेल्या बहुतांश शाळा अतिदुर्गम भागात आहेत. सामान्य गरीब विद्यार्थ्याना जिल्हा परिषद शाळेचाच आधार आहे. तालुक्यातील बंद होत असलेल्या बहुतांश शाळा वस्ती पोळावरील असून अजूनही तिथे पोहोचण्यासाठी चांगले रस्ते नाही, वेळेवर वाहने उपलब्ध होत नाही. अश्या परिस्थितीत शासनाने ० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून दुसऱ्या शाळेत समायोजन केल्यास त्यांचा जाण्या-येण्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊन विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे.
झरी तालुक्यात एकूण ११६ जिल्हा परिषद शाळा असून, त्यातील ३६ शाळा कमी पटसंखेच्या आधारावर शासन बंद करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तालुक्याच्या दृष्टीने हा आकडा खूप मोठा असल्याचे बोलले जात आहे. शासनाने हा निर्णय राबविल्यास तर तालुक्यातील डोंगरी, दुर्गम, वाड्या वस्त्या, पोड व तांड्यावरील हजारो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करणारा ठरेल.