सुरेंद्र इखारे,वणी :- विविध प्रकारच्या सुश्राव्य कार्यक्रमांच्या आयोजनासाठी येथील जैताई देवस्थान विदर्भात विख्यात आहे.जैताई माता मनोकामना पूर्ण करते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. अश्विन व चैत्र नवरात्रातील या मंदिरातील कार्यक्रम विशेष उल्लेखनीय असतात या वर्षी दि. २६ सप्टेंबर ते ५ आँक्टोबर पर्यंत मंदिरात कीर्तन , भाषण , संगीत , जागरण इत्यादी कार्यक्रम आयोजित आहेत.
दि. २६ ला मुकुंदबुवा देवरस यांचे कीर्तन , दि.२७ व २८ ला अनुक्रमे डॉ, उत्तम रूद्रवार व प्रकाश एदलाबादकर यांची पसायदान व संत मुक्ताबाई या विषयावर व्याख्याने आणि २९ तारखेला पांढरकवडा येथील स्वरसाधना प्रस्तुत सुश्राव्य सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. व्याख्यानांच्या कार्यक्रमांचे प्रायोजक विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय या संस्था आहेत. उल्लेखनीय म्हणजे देवरस यांचे कीर्तन जैताई देवस्थानचे प्रथम पुजारी स्व. साधुबुवा संताने यांच्या स्मरणार्थ आयोजित असून त्यांच्या छायाचित्राचे अनावरणही या प्रसंगी होणार आहे.
दि. २ आँक्टोबरला अरुणा सबाने यांना डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते जैताई मात्रुगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दि. ३ आँक्टोबरला विजय चोरडिया प्रायोजित कोमल निनावे , नागपूर प्रस्तुत जागरण कार्यक्रम रंगणार आहे .सर्व कार्यक्रमांसाठी वेळ रात्री ८ वाजताची आहे . रोज सायंकाळी ६.३० वाजता सामुहिक आरतीचा कार्यक्रम राहणार आहे. या सर्व कार्यक्रमांना बंधु भगिनींनी उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.