•निवडणूक आयोगाची विशेष मोहीम……..
अजय कंडेवार,वणी :- ७६- वणी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रामाणिकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीची नाव नोंदणी ओळखण्यासाठी मतदार ओळखपत्र सोबत आधार क्रमांक लिंक केला जात आहे. त्याकरिता उपविभागीय अधिकारी वणी तथा मतदार नोंदणी अधिकारी ७६ – वणी विधानसभा मतदार संघ आयोजित राज्यव्यापी आधार जोडणी शिबिर दिनांक – ११ सप्टेंबर २०२२ ला तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्र व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय येथे ठेवण्यात आले आहे.
मतदार याद्या अधिकाधिक त्रूटीरहीत करण्यासाठी आता मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार समस्त तालुक्यात सुरू करण्यात आली आहे.२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ही मोहीम पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असून मतदारांनी फॉर्म-६ ब भरून द्यावा, असे आवाहन निवडणूक आयोग यांनी केल्या आहे. मतदार याद्या अधिकाधिक निर्दोष करण्यासाठी ही मोहीम असली तरी ती ऐच्छीक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दुबार नावे असणे, पत्ता अपूर्ण असण्यासारखे दोष मतदार यादीमध्ये आढळून येतात. या पार्श्वभूमीवर आता मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी लिंक केले जाणार आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत १०० टक्के मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्याचे उद्दिष्ट निवडणूक आयोगाने ठेवले आहे.
संबंधित मतदाराला त्याकरीता अर्ज क्र. ६ ब भारत निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करणे, एकाच व्यक्तिचे एकापेक्षा अधिक मतदार संघात अथवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी तपासण्यासाठी आधार क्रमांकाचे संकलन उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मतदारांची ओळख पटवणे, मतदार यादीत समाविष्ट माहितीची पडताळणी करणे सोपे होणार आहे.