नागेश रायपूरे, मारेगाव:- शहरातील कापड व्यापाऱ्याला गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी शहरातील भर वस्तीत असलेल्या गोठ्यातून ८ नग बकऱ्या चार चाकी वाहनातून लंपास केल्याची खळबळजनक घटना शहरातील प्रभाग क्र. चार मध्ये घडली. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील वार्ड क्रमांक चार मधील रहिवासी संजय कवडू तुरारे वय ४० वर्षे यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. दरम्यान ३० जानेवारी रोजी नेहमी प्रमाणे जंगलात शेळ्या चारून संध्याकाळी घरा शेजारी असलेल्या गोठयात त्यांनी शेळ्या ठेवल्या.
दरम्यान रात्री २ वाजताचे सुमारास एका चार चाकी वाहनातून काही चोरटे गोठ्यातील बकऱ्या चोरून नेत असतांना घरा शेजारील अजाब सूर यांना दिसले.त्यांनी शेळी मालकाला याची भ्रमणध्वनी वरून कल्पना दिली. चोरट्यांना कोणीतरी जागे झाल्याची चाहूल लागल्याने चोरटे ८ बकऱ्या किंमत८० हजार रुपये घेऊन पळून गेले.
लाल रंगाचे चार चाकी वाहनातून बकऱ्या पळविल्याची व चोरीतील वाहन करंजी मार्गाने गेल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शीनी दिली.यापूर्वी सुध्दा तालुक्यातून बकऱ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. परंतु चोरटे मात्र अद्याप पोलिसांचे हाती लागले नाही.
गेल्या दोन दिवसात भर वस्तीत चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री पोलीस गस्त वाढवून चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकां कडून जोर घरत आहे.