• ग्रामपंचायतचे हेतुपरस्पर दुर्लक्ष
• शेकडो कार्डधारकांचे पैसे पाण्यात.
देव येवले,झरी(वा): तालूक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव म्हणून अडेगावची ओळख आहे. मात्र येथील ग्रामपंचायत लगत आरो प्लांट तीन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे वार्ड क्र १ व ४ मधील नागरिकांना शुद्ध पाण्याकरिता ६०० ते ७०० मीटर पायपीट करत मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अडेगाव येथील ग्रामपंचायत जवळील आरो प्लांट लाखो रुपये खर्च करून तीन वर्षापूर्वी रिलायन्सच्या CSR फंडाअंतर्गत बसविण्यात आला. मोठा गाजावाजा करत याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र केवळ दोन ते तीन महिन्यात बिघाड आल्यामुळे आजपर्यंत बंद पडून आहे. शेकडो नागरिकांना या प्लांटचे पाणी भरण्याकरिता ग्रामपंचायत मार्फत कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्डमध्ये शेकडो नागरिकांचे रिचार्जरुपी पैसे पाण्यात वाया गेल्याचे ग्रामवासी बोलत आहे. अडेगाव येथे वार्ड क्र. ३ व ग्रामपंचायत जवळ असे दोन आरो प्लांट असून वार्ड क्र. ३ मधील आरो प्लांट बंद पडला असता ग्रामपंचायत जवळील आरोचे सामान दुसऱ्या आरोला प्लांटला लावून तब्बल ९० हजाराचे बिल काढण्यात आले. या संदर्भात ग्राम पंचायत व गावकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सरपंच यांचेवर ग्रामसभेत ग्रामस्थाकडून करण्यात आला होता.
याकडे सबंधित अधिकारी व लोक प्रतिनिधीनी हेतुपरस्पर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. आरो प्लांटच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कुणीही ढूंगुनही पाहायला तयार नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.