Sunday, November 22, 2026
HomeBreakingगजबजलेल्या टिळक चौकातच लोकमान्य टिळकांच्या विटंबनासदृश अवस्था.....

गजबजलेल्या टिळक चौकातच लोकमान्य टिळकांच्या विटंबनासदृश अवस्था…..

Ajay Kandewar,Wani:- शहरातील मध्यवर्ती आणि कायम गजबजलेल्या टिळक चौकात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या छायाचित्राची झालेली दुरवस्था पाहून नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. चौकाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळातील लोकमान्य टिळकांचे छायाचित्र चक्क फाटलेल्या अवस्थेत असून, त्यावर मोठी चीर पडलेली स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे, हा काही आडवळणाचा किंवा नागरिकांच्या नजरेस न पडणारा चौक नाही. दिवसभर नागरिकांची वर्दळ, वाहनांची ये-जा, आजूबाजूला मोठमोठी दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने असलेल्या या चौकातच महापुरुषांच्या छायाचित्राची अशी अवस्था असणे ही खेदजनक बाब आहे.

यातील विशेष बाब म्हणजे, लोकमान्य टिळकांच्या स्मृतिस्थळाच्या अगदी समोरच एका व्यावसायिकाचे मोठे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांसह परिसरातील व्यावसायिकांच्या नजरेस हे स्मृतिस्थळ सहज पडू शकते. मात्र, समोरच लोकमान्य टिळकांचे छायाचित्र फाटलेल्या अवस्थेत असतानाही त्याची दखल घेऊन संबंधित प्रशासनाला कळविण्याचा किंवा छायाचित्र बदलण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. व्यवसायाच्या गजबजाटात परिसरातील महापुरुषांच्या स्मृतिस्थळाच्या संवर्धनाची सामाजिक जबाबदारीही विसरली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. अर्थात, या स्मृतिस्थळाची अधिकृत देखभाल नेमकी कोणाकडे आहे, हेदेखील स्पष्ट होणे आवश्यक आहे.

लोकमान्य टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चौकात त्यांच्या छायाचित्राची अशी अवस्था असणे ही केवळ देखभालीची बाब नाही, तर महापुरुषांच्या स्मृतींबाबत आपण किती जागरूक आहोत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. चौकाला नाव देणे, स्मृतिस्थळ उभारणे आणि त्यावर छायाचित्र लावणे एवढ्यावरच जबाबदारी संपत नाही. त्या स्मृतींचे जतन आणि नियमित संवर्धन करणेही तितकेच आवश्यक आहे. नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि परिसरातील व्यावसायिकांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आता तरी संबंधित प्रशासन जागे होऊन फाटलेल्या छायाचित्राच्या जागी नवीन छायाचित्र लावणार का? की लोकमान्य टिळकांच्या नावाचा चौक त्यांच्या फाटलेल्या छायाचित्रासह असाच दुर्लक्षित राहणार, हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page