Ajay,Wani : शिक्षक दिनाचे औचित्य साधून मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत व ग्रामशिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी आणि नवनियुक्त केंद्र समन्वयकांच्या सत्काराचा दिमाखदार सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महादीप परीक्षा, भारत टॅलेंट्स सर्च परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या कल्याणी नागरकर,आर्या गौरकार, लावण्या लोडे, तन्मय चिट्टलवार, लक्ष्मी पारखी व चैताली बोबडे यांचा भारतीय संविधानाची प्रत, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कोलगाव येथील शिक्षक तथा नवनियुक्त केंद्र समन्वयक विजय घोडमारे व प्रवीण बेहेरे तसेच शाळेचे केंद्र समन्वयक चिनू निरंजने यांचाही सन्मान करण्यात आला. सरपंच सौ. अभिषा निमसटकर आणि ग्रामशिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती मंगला उमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक हे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारे नसून विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे देणारे मार्गदर्शक आहेत. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढला असला तरी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांचे महत्त्व कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचे बळ निर्माण करण्यावर शिक्षकांनी भर द्यावा, असे ग्रामशिक्षण समितीचे शिक्षणतज्ज्ञ राजू निमसटकर यांनी आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना विजय घोडमारे, प्रवीण बेहेरे व चिनू निरंजने यांनी आपण याच शाळेत शिक्षण घेत मोठे झाल्याने गाव आणि समाजाप्रतीची जबाबदारी ओळखून शैक्षणिक विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत व ग्रामशिक्षण समितीने पुढाकार घेतला, तर राजू निमसटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. उज्वल शंबरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर पैकूजी आत्राम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

