● 1993 पासून शेतकरी-कामगारांच्या चळवळीत सक्रिय
वणी : – वणी तालुक्यातील शेतकरी-कामगारांच्या चळवळीतील ख्यातनाम चेहरा असलेले कॉ. ऍड. दिलीप परचाके यांची निवड देशपातळीवर अग्रगण्य शेतकऱ्यांची संघटना असलेली अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य अधिवेशनात राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून करण्यात आली असून त्यांच्या निवडीने यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऍड. दिलीप परचाके हे गेल्या 29 वर्षांपासून सातत्याने चळवळीत सक्रिय असून शेतकरी व कामगार चळवळीतील एक सुपरिचित नाव आहे. शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करीत असताना ह्यांचे वर अनेक केसेस दाखल झाल्या असून तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला आहे. 1993 मध्ये अवघ्या 15 व्या वर्षी विद्यार्थ्यांचा प्रश्नावर संघर्ष करता करता ते विद्यार्थी, युवक, शेतमजूर, कामगार व शेतकरी संघर्षात ओढले गेलेत व ते अनवरत कार्यरत आहेत. ऍड. परचाके यांचा जन्म वणी तालुक्यातील रांगणा ह्या लहानशा खेड्यात झाला असून ते गेल्या 15 वर्षांपासून तेथे ग्रापं सदस्य आहेत. त्यांनी रांगणा येथील सरपंच पद भूषविले आहे, सध्या हल्ली ते तेथील उपसरपंच आहेत.
चळवळीत कार्य करीत असतानाच त्यांनी एल एल बी चे शिक्षण पूर्ण केले. कष्टकऱ्यांना व जन सामान्यांना न्याय देण्यासाठी ते सध्या वणी, मारेगावI व पांढरकवडा न्यायालयात वकील म्हणून कार्य करीत आहेत.
नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अधिवेशन दि. 31 ऑक्टो ते 2 नोव्हेंबर 22 ला झाले. महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यातून जिल्हा अधिवेशनातून निवडलेल्या 300 च्या वर प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर तीन दिवस चर्चा करून अनेक महत्वाचे ठराव पारित केले आहेत. शेवटच्या दिवशी पुढील तीन वर्षासाठी नवीन राज्य कार्यकारिणी निवडण्यात आली. ह्या कार्यकारिणी मध्ये यवतमाळ जिल्ह्यातून कॉ. ऍड. दिलीप परचाके यांची निवड करण्यात आली. त्यांचा ह्या निवडीने ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील व त्यासाठी ते मोलाचे कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ऍड. परचाके हे आपल्या निवडीचे श्रेय कॉ. शंकरराव दानव व कॉ. कुमार मोहरमपुरी यांना देतात.