कायर परिसरात रात्रीस खेळ चाले : वाळू होय काय कुबेराचा खजिना?
•कलेक्टरकडे माहिती गेल्याची खमंग चर्चा..
•चोरटे करीत आहे पोटभरू राजकारण?
•सकाळी लावालावी राजकरण करायचं अन् रात्री चोरी का? अशीही खमंग चर्चा सुरू आहे.
अजय कंडेवार, वणी :– कायर गावाजवळून वाहणारी नदी गाववासीयांसाठी समृद्धी आणते. तिच्यातून मिळणाऱ्या अमृताने कितीतरी जीवांना जीवदान मिळते. अशीच समृद्धी कायर परिसरातील नदीच्या विस्तीर्ण काठावर बारीक वाळू निपजली. जमीन पाणी शोषून राहात असल्याने भूजलस्तरही वाढला. परंतु, रेतीमाफियांची वाईट नजर गेली आणि नदीपात्राची ऐशीतैशी झाली. स्वार्थ रेती माफियांमुळे नदीपात्रात खोल डोह पडले, ज्यात अनेकांचे जीवही गेले. रेती म्हणजे कुबेराचा खजिना, असेच समजून रेतीचोरीचा गंदा धंदा रात्रीच चालतो. त्यावर राबणाऱ्या मजूर, वाहनचालकांना अतिशय अल्प मोबदला देऊन हे जिकरीचे काम त्यांच्याकडून करवून घेतले जाते.ही एक शोकांतिकाच म्हणावे लागेल.अशीच गती कायर परिसरात जोमात सूरु आहे.काही गाव राजकारण करणारे त्यात समाविष्ट असल्याचं बोलल्या जात आहे.
हाताला काम नसल्याने हा जीवघेणा सौदा ते रोज करतात. या धंद्यावर गब्बर मात्र दुसरेच होतात. महसूल प्रशासनाच्या डोळ्यांदेखत सार खेळ सुरू असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असाच हा मामला आहे. या प्रकाराने स्थानिक त्रस्त आहेत. रात्रभर सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही.
जड वाहतुकीमुळे रस्ते रस्ते राहिलेले नाहीत. वाहनांच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढी भयंकर स्थिती असताना कुणी दखल कशी घेत नाही, हा प्रश्न मनाला अस्वस्थ करणारा आहे. आता स्वतः यात यवतमाळ जिल्हाधिकारी यात दखल घेणार असल्याचे बोलल्या जात आहे. रेती तस्कर गावात सकाळी लावालावी राजकरण करायचं अन् रात्री चोरी करायची का? अशी खमंग चर्चात्मक स्पष्ट सवाल उपस्थित होत आहे..