Ajay Kandewar, Wani:- वणी शहराच्या राजकीय, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा आणि तितकाच दिलासादायक निर्णय समोर आला आहे. वणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राजकारणातून पूर्णतः बाहेर आले असून, आता संपूर्ण वेळ वैद्यकीय क्षेत्रात स्वतःला झोकून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.डॉ. लोढा हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर एक संवेदनशील,अभ्यासू आणि लोकाभिमुख डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारणाच्या धावपळीतही त्यांनी कधीच रुग्णसेवेपासून पाठ फिरवली नाही. मात्र आता कोणताही राजकीय दुवा न ठेवता, संपूर्ण लक्ष आरोग्यसेवेकडे केंद्रीत करण्याचा ठाम संकल्प त्यांनी घेतला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. लोढा यांच्या नेतृत्वाखालील रुग्णालयात 24 तास अखंड वैद्यकीय सेवा, आधुनिक उपचार पद्धती आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शासकीय आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा, यासाठी डॉ. लोढा स्वतः लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट होत आहे.आजपर्यंत गंभीर आजारांसाठी नागपूर, मुंबई, बेंगळूरसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेणाऱ्या वणी विधानसभा क्षेत्रातील रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार मिळणार असल्याची आशा या निर्णयामुळे निर्माण झाली आहे. हा निर्णय म्हणजे केवळ वैयक्तिक वाटचाल नाही, तर वणीच्या आरोग्य व्यवस्थेसाठी एक नवा मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
“रुग्णसेवा हीच माझी खरी सेवा आहे,” या एका वाक्यातूनच डॉ. लोढा यांची सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी वृत्ती स्पष्ट होते. राजकारणातील एक अध्याय त्यांनी स्वेच्छेने बंद केला असला, तरी रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी सुरू झालेला हा नवा अध्याय वणीसाठी सुवर्णकाळ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.आज वणी शहरात डॉ. महेंद्र लोढा यांचा हा निर्णय नेतृत्वापेक्षा माणुसकीला प्राधान्य देणारा, सत्तेपेक्षा सेवेला मोठे मानणारा म्हणून ओळखला जात असून, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनहोत आहे.

