•प्रसिद्ध विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचे प्रतिपादन
देव येवले ,झरी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचेच कैवारी नव्हते तर ते संपूर्ण देशाचे नेते होते, 85 टक्के बहुजनांचे उद्धारकर्ते होते. असे रोखठोक प्रतिपादन औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर यांनी 15 ऑक्टोबरला वणी येथील बाजोरिया लाँन येथील बळीराजा व्याख्यानमालेत केले.
शिव महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी वणी येथे बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदा व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष आहे. या व्याख्यानमालेतील पहिल्या दिवशीच्या स्मृतीशेष रामचंद्र जागोजी सपाट स्मृती प्रित्यर्थ दलितेतरांसाठी बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बोलताना श्री. लुलेकर म्हणाले की, बाबासाहेब जन्मलेच मुळात दलित समाजात. त्यामुळे त्यांना त्यांचे दुःख, हालअपेष्टा स्वतःच्या अनुभवातून आल्याने; दलितांच्या उद्धारासाठी ते आईच्या काळजाने झटले म्हणूनच ते खऱ्या अर्थाने भिमाई ठरतात.
बाबासाहेबांचे शेतकरी, कामगार ,स्त्रिया यांच्याकरिता अतुलनीय कार्य असून महात्मा फुले यांच्यानंतर शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांनी जेवढे कार्य भारतात केले तेवढे कोणीही केले नसल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 1938 मध्ये भारतात पहिल्यांदा मुंबई येथे शेतकऱ्यांचा मोर्चा त्यांनी काढला व त्यात 25 हजार शेतकरी सहभागी झाले होते. शेती, उद्योग, अर्थ, रस्ते, पाणी, वीज, नद्या, धरणे,प्रकल्प इत्यादी बाबतीत बाबासाहेबांनी मंत्रिपदावर असताना अफाट काम केले .भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमात आणि अनुसूचित जातीच्या आधी कलम 340 योजून देशातील तमाम ओबीसींना न्याय देण्याचे मोठे काम बाबासाहेबांनी केले, परंतु आजही ओबीसींना बाबासाहेब आपले वाटत नाही, हे दुर्दैव आहे. ज्या दिवशी ओबीसी बाबासाहेबांचे विचार समजून घेतील, त्या दिवशी या देशाचे सत्ताधीश ओबीसी असेल. असा ठाम आशावाद श्री. लुलेकर यांनी व्यक्त केला.
बाबासाहेबांनी आपल्या हयातीत संपूर्ण वाटचालीत कधीही जात, धर्म, पंथ, मानला नाही. जेथे अन्याय तेथे बाबासाहेब हे समीकरण त्यांनी रुजवले.त्यामुळे दिनकरराव जावळकर असो की र. धो. कर्वे असो त्यांची जात न पाहता त्यांच्यावरील बाणीच्या प्रसंगी त्यांचे वकीलपत्र घेऊन न्यायालयात बाजू मांडली .स्त्रिया आणि ओबीसी यांच्या हिताचे हिंदू कोड बिल मान्य होत नाही हे लक्षात येताच मंत्रीपदाचा राजीनामा देणारे, आपल्या सर्वच संशोधन साहित्यात दलितांपेक्षाही आर्थिक, सामाजिक ,राजकीय विषय मांडणारे डॉ. बाबासाहेबआंबेडकर हे फक्त दलितांचेच कैवारी कसे होऊ शकतात ?असा सवाल श्री लुलेकर यांनी उपस्थितांना केला .
व्याख्यानमालेचा आरंभ कृषी संस्कृतीचा उद्धारकर्ता बळीराजा, माँ जिजाऊ आणि बाबासाहेबआंबेडकर यांच्या प्रतिमांना हारार्पण व दीप प्रज्वलनाने झाला. नुकतेच हिमाचल प्रदेशात देशाच्या सीमेवर शहीद झालेले नजीकच्या मुर्धोनी येथील लेफ्टनंट कर्नल वासुदेव दामोदर आवारी यांना याप्रसंगी आदरांजली वाहन्यात आली. जिजाऊ वंदनेचे गायन दिगंबर ठाकरे व जयंत कुचनकर यांनी केले. प्रास्ताविक शिव महोत्सव समितीचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांनी, संचालन सोनाली जेनेकर यांनी तर आभार शिवमहोत्सव समितीचे प्रसिद्धी प्रमुख संदीप ठाकरे यांनी मानले .विचारपिठावर अध्यक्षस्थानी शहाबुद्दीन अजाणी, अध्यक्ष शिव महोत्सव समिती वणी, प्रमुख पाहुणे डॉक्टर चेतन खुटेमाटे ,प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ ,चंद्रपूर -(अध्यक्ष शिव महोत्सव समिती, चंद्रपूर) डॉ.शरद जावळे, उपविभागीय अधिकारी, वणी प्रदीप बोनगीरवार, अध्यक्ष ओबीसी कृती समिती,ममता जोगी, मुख्याध्यापिका सरस्वती हायस्कूल,मुकुटबन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानमालेला वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील व चंद्रपूर येथील श्रोत्यांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती.