अजय कंडेवार,वणी:– राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देणारे विधेयक आज दोन्ही सभागृहात महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सर्वस्वी देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुती राज्य सरकार सातत्याने सर्व समाज घटकांसाठी कार्यरत आहे. आज सामाजिक न्याय दिन आहे. त्या निमित्ताने ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. राज्य सरकारच्या या भूमिकेचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी अभिनंदन केले.
राज्य सरकारच्या भूमिकेचं ओबीसी समाजाच्या विविध संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी देखील अभिनंदन केले आहे.राज्य सरकारने हा निर्णय घेतला,ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ,राजकीय आरक्षण न देता मराठयांना आरक्षण दिले हा सुद्धा निर्णय स्वागतार्ह आहे. ओबीसी समाजाचे नुकसान झाले नाही. ओबीसी समाजाचा विजय झाला.एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावल्यामुळे सभागृहातील सर्व सदस्यांचे, विरोधी पक्षनेते आणि सर्व गटनेत्यांचे आभार मी मानतो आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे, याचा मला व ओबीसी समाजाला आनंदच झाला आहे, असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.