अजय कंडेवार,वणी :– भारतीय सांस्कृतिक वारसा लोकांपर्यंत पोहचावा यासोबतच स्वच्छ पर्यावरणाचा संदेश देत श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत एकल सायकल यात्रा करीत असलेले पद्मश्री डॉ. किरण सेठ यांचा वणी येथे ऍक्सिस बँके व काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
स्पीक मॅके संस्थेचे संस्थापक डॉ. किरण सेठ यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी श्रीनगर येथून एकल सायकल यात्रेचा प्रारंभ केला. गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे स्वागत झाले. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश करत डॉ. सेठ यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वागत होत असून वणी येथे ऍक्सिस बँकेच्या वतीने बँकेच्या कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रस्ताविकातून व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांनी सत्कार आयोजनामागील भूमिका विषद केली. या समाजात अनेक लोकं चांगले कार्य करीत असतात. त्या कामाचा उद्देश समाजापर्यंत प्रभावरीत्या पोहोचला तर त्याची परिणामकारकता अधिक असेल आणि त्या चांगल्या कार्याला बळ मिळेल. याच उद्देशातून डॉ. किरण सेठ यांच्या कार्याला समाजापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर यांनी डॉ. किरण सेठ यांच्या सायकल यात्रेच्या माध्यमातून केलेल्या समर्पणाची महती सांगितली. डॉ. सेठ यांचे कार्य लाख मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. किरण सेठ यांनी या कार्यक्रमासाठी कुठलीही ओळखी नसताना स्वतःहून पुढाकार घेणारे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे, प्रमोद वासेकर यांचे कौतुक केले. समाजाला अशा व्यक्तीची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी तालुका काँग्रेस आणि ऍक्सिस बँक व्यवस्थापनातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनीही डॉ. सेठ यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत भटवलकर यांनी केले. कार्यक्रमाला यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर, ऍक्सिस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे, प्रशांत भटवलकर, कुणाल वासेकर, सचिन वाघ आदी उपस्थित होते. आशीष केळझरकर, प्रिया हस्ते, शाकीब खान, चंदन शर्मा, मुकेश मेहता, रोशनी प्रसाद, विकेश हेडाऊ, राजेश पारधी, चंदू चौहान यांनी सहकार्य केले.