Ajay,Wani:- रेल्वे अपघातात दोन्ही पाय निकामी झाल्याने येनाडी येथील अनिल ठेगणे यांच्यासमोर दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विशेषतः घराबाहेर ये-जा करण्यासाठी त्यांना व्हीलचेअरची नितांत आवश्यकता होती. अनिल यांची ही गरज आणि त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन आयुष रोहिदास ठाकरे मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत त्यांना व्हीलचेअर भेट देत मदतीचा संवेदनशील हात पुढे केला. या उपक्रमामुळे अनिल यांच्या दैनंदिन हालचालींना मोठा आधार मिळणार असून, केवळ मदतीपुरते मर्यादित न राहता एका गरजू व्यक्तीच्या जीवनात स्वावलंबनाची नवी उमेद निर्माण करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न ठरला आहे.
समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. आयुष रोहिदास ठाकरे मित्र परिवाराच्या या संवेदनशील पुढाकाराचे परिसरातून कौतुक होत आहे. यावेळी तुळशीराम ठाकरे, रवींद्र वाटेकर, मयूर बादूरकर, गजानन उगे, नरेश गोखरे, मारोती मासिरकर आणि प्रफुल भोगळे यांच्यासह आयुष रोहिदास ठाकरे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

