Ajay Kandewar,Wani:वणी तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना शासन आदेशानुसार मोफत रेती तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी युवा सेना वणी विधानसभा समन्वयक आयुष रोहिदास ठाकरे यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सन 2024-25 व 2025-26 मध्ये तालुक्यात 5260 घरकुले मंजूर झाली असून त्यापैकी केवळ 867 पूर्ण, तर 4393 घरकुले रेतीअभावी अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शासनाच्या स्पष्ट आदेशानुसार घरकुल लाभार्थ्यांना रेती मोफत देणे बंधनकारक असताना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एकाही लाभार्थ्याला मोफत रेती मिळालेली नाही. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांनी जुनी घरे पाडून नवीन घराच्या आशेवर उघड्यावर संसार करावा लागत असून, खुल्या बाजारातून महागडी रेती खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याने लाभार्थ्यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे, अशी तीव्र नाराजी निवेदनात व्यक्त करण्यात आली.
तालुक्यातील नदीपात्रात प्रचंड रेती साठा उपलब्ध असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, तातडीने मोफत रेती पुरवठा सुरू न झाल्यास युवा सेनेतर्फे घरकुल लाभार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी अजिंक्य शेंडे, सुरेश शेंडे, मिलिंद बावणे, अनिकेत बलकी, बंडू देवाळकर व दिनेश मालेकर उपस्थित होते.

