● राजूर येथे भगतसिंग जयंती साजरी
अजय कंडेवार,वणी :- देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी व शोषणमुक्त समाजव्यवस्था आणण्यासाठी वयाच्या 23 व्या वर्षी इंकलाब जिंदाबादच्या नारा देत हसत हसत फासावर जाणारे शहीद ए आजम भगतसिंग यांचे जयंतीनिमित्त राजूर येथे त्यांना अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
येथील शहीद भगतसिंग चौकातील त्यांच्या प्रतिमेला येथील पोस्टमास्तर विलास देवतळे व ऍड. हरीश तेलतुंबडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
इंग्रजांच्या साम्राज्यशाहीच्या जोखडातून बाहेर पडत असताना त्यांनी निर्माण केलेली शोषणाची व्यवस्था नष्ट होणे गरजेचे आहे, असे भगतसिंगना जाणवल्या मुळे त्यांनी रशियन क्रांतीची प्रेरणा घेऊन शोषणविरहित समाजवादी व्यवस्था आणण्यासाठी क्रांतिकारी विचार तरुणांमध्ये पेरले. इंग्रजांनी त्यांना अटक करून तुरुंगात टाकले असताना, न्यायालयात असताना व मृत्यूला सामोरे जाताना त्यांनी या देशातील तरुणांना आवाहन केले की, माझ्या मृत्यूनंतर या देशातील तरुण प्रेरणा घेऊन या देशात अन्यायावर, शोषणावर आधारलेली व्यवस्था संपवतील. परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या काळ लोटल्यानंतरही अथक परिश्रमातून निर्माण केलेले संविधान व कष्टकऱ्यांसाठी असलेल्या कायद्याला पायदळी तुडविण्याचे कार्य या देशातील भांडवलदारी व्यवस्था व शासनकर्ता वर्ग करताना दिसत आहे. अश्या प्रसंगी शहीद भगतसिंग यांचे विचार व कृती मार्गदर्शन करते, म्हणून आजच्या तरुणांनी शहीद भगतसिंग यांच्या विचारावर कृती करावी, असा सूर या जयंती कार्यक्रमात विचार प्रकट करीत असताना कॉ. कुमार मोहरमपुरी, अशोक वानखेडे, विलास देवतळे, ऍड. हरीश तेलतुंबडे, लीलाधर आरमोरीकर, कॉ. नंदकिशोर लोहकरे, सरोज मून, वैभव मजगवळी, महेंद्र श्रीवास्तव, राहुल कुंभारे, जयंत कोयरे आदींनी केले.
कार्यक्रमात येथील गायक राजेंद्र पुडके व इरफान पत्रकार यांनी क्रांतिकारी गीते गाऊन कार्यक्रमात जोश जागविला. कार्यक्रमाला प्रामुख्याने मो. असलम, साजिद खान, अशफाक अली,सिनू दासारी, समन्ना मैकलवार, मनीष इंगळे, गजानन खाडे, रतन राजगडकर, उत्तम धोटे, संजय काटकर, शंकर हिकरे, खालिद हुसेन, जाबिर अली, चंदू मोडक, मारोती कोंडागुर्ले, मनोज सोनेकर, गजानन खैरे, अशोक बाभळे, कश्यप आदी उपस्थित होते.