Ajay kandewar,Wani:- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या दुरुस्तीचे काम गेल्या दहा महिन्यांपासून रखडले आहे. नगर परिषदेकडून दिलेल्या आश्वासनांनंतरही आजतागायत फक्त अर्धवट काम करून ठेवण्यात आले असून वाचनालय पुन्हा लोकउपयोगी होण्याचे स्वप्न धुसरच राहिले आहे.याविरोधात भिम आर्मी संघटनेचे वनी विधानसभा अध्यक्ष रविंद्र मेश्राम यांनी पुन्हा एकदा नगर परिषदेला जाब विचारला आहे. “वाचनालय दुरुस्ती सात दिवसांत पूर्ण करा; अन्यथा दि. १६ सप्टेंबरपासून नगर परिषदेविरुद्ध ‘भिक मांगो आंदोलन’ छेडण्यात येईल,” असा ठाम इशारा संघटनेने दिला आहे.

गेल्या वर्षी नगर परिषदेने एक महिन्यात काम पूर्ण करण्याची हमी दिली होती. मात्र आज दहा महिने उलटून गेले तरी वाचनालय आजही मोडकळीस आलेल्या अवस्थेतच आहे. यावरून नगर परिषदेची कामकाज शैली आणि नागरिकांबद्दलचा बेफिकीरीचा दृष्टिकोन उघड होत असल्याची टीका संघटनेने केली आहे.यापूर्वीही १७ जुलै रोजी विचारणा केली असता नगर परिषदेकडून “निधी नाही” असे कारण पुढे करण्यात आले होते. मात्र, महापुरुषांच्या जयंती, धार्मिक उत्सवांसाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो आणि वाचनालयासाठी निधी नसल्याचे सांगितले जाते, हा दुजाभाव नगरपरिषदेकडून जाणूनबुजून केला जात असल्याचा आरोप भिम आर्मीने केला आहे.
•वाचनालयाचे रूपांतर ‘भिक मांगो’ आंदोलनात!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारलेले वाचनालय हे सामाजिक आणि शैक्षणिक जडणघडणीचे केंद्र ठरले पाहिजे. मात्र नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे ते आज बंद अवस्थेत आहे. “नगर परिषदेचा निधी कुठे खर्च होतो हे जनतेला दाखवण्यासाठीच ‘भिक मांगो आंदोलन’ छेडणार आहोत,” असे भिम आर्मीने स्पष्ट केले.नगर परिषदेच्या दिरंगाईमुळे वाचनालयाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. आता सात दिवसांत काम पूर्ण झाले नाही तर नगर परिषदेच्याच दाराशी “भिक मांगो” आंदोलन सुरू होणार, यात शंका नाही
.

